राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांचा समाधी विधी संपन्न, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

लातूर : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांची काल प्राणज्योत मालवली होती. गेल्या चार दिवसांपासून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. काल रात्री अहमदपूर येथील भक्तिस्थळ याठिकाणी त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

अंतिम संस्काराला भक्तिस्थळ या भागात भाविकांची गर्दी होऊ नये यासाठी प्रशासनाने खबरदारी घेत मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेत या भागात लोकांनी येऊ नये असे आवाहान प्रशासनाने केले होते. महाराजांचा भक्तवर्ग महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, तेलंगना आणि कर्नाटकात अधिक प्रमाणात आहे. अनेकांनी अंतिम संस्काराला येण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी दुतर्फा पाच किलोमीटर अंतरापासूनच बॅरिकेटिंग केले होते. नांदेड येथून पार्थिव रात्री भक्तिस्थळ भागात दाखल झाले. या ठिकाणी भजन आणि नाम संकीर्तनात पार्थिव समाधीच्या ठिकाणी आणण्यात आले. भक्तिस्थळ या ठिकाणी बिचकुंदा मठ संस्थानचे मठाधीश सोमलिंगेश्वर शिवाचार्य महाराज समाधीच्या विधीची व्यवस्था पाहात होते.

संपूर्ण विधिवत समाधी विधी त्यांच्या नेतृत्वात पार पाडण्यात आला. कोरोनाचा संसर्ग लक्षात घेवून समाधी विधी पार पाडणार्‍या सर्व लोकांना पीपीई किट देण्यात आले होते. समाधीच्या ठिकाणी सर्वसामान्य लोकांचा प्रवेश बंद करण्यात आला होता. लातूरचे जिल्हाधिकारी जी श्रीकांत आणि लातूरचे पोलिस अधीक्षक राजेंद्र माने यांच्या नेतृत्वात संपूर्ण पोलिस दल या ठिकाणी हजर होते. बंदुकीच्या फेरी झाडून शासकीय मानवंदना देण्यात आली. औसा मतदरसंघाचे आमदार अभिमन्यू पवार, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक यांनी पुष्पचक्र अपर्ण केले. मठाचे उत्तराधिकारी राजेश्वर स्वामी आणि हाडोळती मठाचे उत्तराधिकारी राजकुमार स्वामी यांच्याकडे कारभार सोपवण्यात आला.