समाजवादीच्या अबू आझमींची मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मागील काही दिवसापासून मनसे पक्षाच्या झेंड्याचा रंग बदलणार असल्याची चर्चा सुरु असतानाच भविष्यात भाजप आणि मनसे एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आले. मध्यंतरी देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर या चर्चांमध्ये आणखीनच वाढ झाली. राज ठाकरे यांची भाजपसोबत वाढत असलेली जवळीक याच पार्श्वभूमीवर समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अबू आझमी यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

लोकसभेच्या निवडणुकीत राज ठाकरे यांनी मिमिक्री करून भाजपवर टीका केली होती. त्यामुळे राजकीय फायद्यासाठी त्यांचं भाजपसोबत जाणं योग्य नसल्याचे आझमी यांनी म्हटले आहे. तसेच राज ठाकरे हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कुटुंबातील सदस्य आहेत. त्यांनी त्या घराण्याचा तरी सन्मान ठेवावा आणि भाजपसमोर गुडघे टेकू नका असा सल्ला अबू आझमी यांनी राज ठाकरेंना दिला आहे. त्याचप्रमाणे वारंवार थुंकून चाटणे योग्य नाही अशी खरमरीत टीका देखील अबू आझमींनी राज ठाकरे यांच्यावर केली आहे.

दरम्यान, येत्या 23 जानेवारीला मनसेचं महाअधिवेशन होणार आहे. या अधिवेशनात राज ठाकरे नवी भूमिका जाहीर करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. आजपर्यंत राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर प्रत्येक सभेमध्ये निशाणा साधला आहे. त्यामुळे महाअधिवेशनात राज ठाकरे काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. तसेच मनसेच्या नेत्यांनी भाजपसोबत जाण्याबाबतचे संकेत दिले आहेत. त्यामुळे यावर देखील राज ठाकरे आपले मत व्यक्त करतील असे सांगण्यात येत आहे.

फेसबुक पेज लाईक करा https://www.facebook.com/policenama/