समाजवादी पार्टीचे खासदार आझम खान यांची प्रकृती अचानक बिघडली, मेदांता हॉस्पिटलमध्ये दाखल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तुरुंगात असलेले समाजवादी पक्षाचे खासदार आझम खान यांना कोरोनाचा संसर्ग झाला असून प्रकृती बिघडल्याने त्यांना लखनौमधील मेदांता रुग्णालयात दाखल केले आहे. रविवारी (दि. 9) अचानक प्रकृती बिघडल्यानंतर आझम खान यांना कडेकोट पोलिस बंदोबस्तात सीतापूर तुरुंगातून रुग्णालयात आणण्यात आले. खान यांना सध्या ऑक्सिजन सपोर्टवर ठेवले आहे. दरम्यान आझम खान यांच्यासोबत त्यांचा मुलगा अब्दुल्लाह यालाही कोरोनाची बाधा झाली असून त्यालाही उपचारासाठी मेदांता रुग्णालयात दाखल केले आहे.

मेदांता रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. राकेश कपूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आझम खान यांच्यावर क्रिटिकल केअर टीम देखरेख करत आहे. गेल्या आठवड्यात त्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. सुरुवातीला केलेल्या तपासणीमध्ये त्यांच्यामध्ये कोरोनाचे मॉडरेट इंफेक्शन दिसून आले. त्यानंतर आता त्यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांना 4 लीटर ऑक्सिजनवर ठेवल्याचे डॉ. कपूर यांनी सांगितले. तसेच त्यांची ऑक्सिजन लेव्हल 90 च्या आसपास आहे. तसेच आझम खान यांचा मुलगा मोहम्मद अब्दुल्लाह खान यालाही कोरोनाची बाधा झाल्याने रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे. परंतू त्यालाही डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवले आहे. तुरुंग प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, आझम खान आणि त्यांच्या मुलगा कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.