शेतकर्‍यांमध्ये नक्षलवादी, देशद्रोही दिसणार्‍या सरकारच्या DNA मध्ये गोडसे, सावरकर

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन – कृषी कायदे रद्द करावेत, या रास्त मागणीसाठी देशातील शेतकरी दिल्लीच्या सीमेवर कडाक्याच्या थंडीत गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन करत आहे. मात्र सरकारकडून हे आंदोलन दाबण्यासाठी विविध प्रयत्न केले जात आहेत. ज्यांच्यामध्ये नथुराम गोडसे आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा DNA आहे, त्याच लोकांना या शेतकऱ्यांमध्ये नक्षलवादी आणि देशद्रोही दिसतात, असे समाजवादी पार्टीचे नेते सुनील सिंह साजन ( Samajwadi Party Leader Sunil Singh Sajan) यांनी म्हटले आहे.

साजन म्हणाले की, सपाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी ठरवले आहे की शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ गावोगावी फिरून कायद्याविरोधात निषेध नोंदवायचा आहे. आमच्या विरोधात कितीही खटले दाखल केले तरीही आम्ही थांबणार नाही. आम्हाला जेलमध्ये टाकले किंवा आंदोलन दडपण्यासाठी कोणत्याही पद्धतीचा वापर केला तरी आम्ही एकही पाऊल मागे हटणार नाही. शेवटपर्यंत समाजवादी पक्ष तीन काळ्या कायद्यांविरोधात निषेध करतच राहील, असे साजन यांनी म्हटले आहे.

गावोगावी जाऊन भाजपाचा खोटारडेपणा उघड करू
सुनील सिंह साजन यांनी उत्तर प्रदेशच्या सर्व जिल्ह्यात आणि शहरात पक्ष कार्यालयात आमचे कार्यकर्ते शांततापूर्ण आंदोलन करत निषेध नोंदवतील. सरकारला जे काही करायचं आहे ते त्यांनी करावं. समाजवादी पार्टीचे कार्यकर्ते प्रत्येक गावात जाऊन भाजपाचा खोटारडेपणा उघड करतील असे म्हटले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहेत. केंद्र सरकारने कृषी कायदा मागे घ्यावा अशी मागणी शेतकरी करीत आहेत. यासाठी गेल्या काही दिवसांपासून दिल्ली सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे.

सरकारला आणखी किती शेतक-यांचे बळी हवेत?
नव्या कृषी कायद्यांवरुन दिल्लीच्या वेशीवर सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला राहुल गांधी आणि काँग्रेसने पाठिंबा दिला असून केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. याच दरम्यान काँग्रेसने पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. आंदोलनात 17 दिवसांमध्ये 11 शेतकऱ्यांना बलिदान द्यावं लागले आहे. मात्र तरी देखील मोदी सरकारच्या हृदयाला पाझर फुटला नसल्याचे म्हटले आहे. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी आपल्या ट्विटर आकाऊंटवरून मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. गेल्या 17 दिवसांमध्ये 11 शेतकरी बांधवांच्या बलिदानानंतरही निरंकुश मोदी सरकारच्या हृदयाला पाझर फुटलेला नाही. ते अजूनही अन्नदात्यांबरोबर नाहीतर धनदात्यांबरोबरच का आहेत? देशाला जाणून घ्यायच आहे की राजधर्म मोठा की राजहट्ट ? असे सुरजेवाला यांनी म्हटले आहे.