मुलायमसिंह यांच्यासह परिवारातील अन्य दोघांच्या लोकसभा उमेदवारीची घोषणा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – समाजवादी पक्षाने उत्तर प्रदेशातील आपल्या पक्षाच्या सहा लोकसभा उमेदवारांच्या नावाची घोषणा आज  केली. या सहा नावामध्ये यादव परिवाराचेच तीन सदस्य आहेत. यामध्ये मुलायम सिंह यांच्यासह धर्मेंद्र यादव आणि अक्षय यादव या यादव परिवारातील सदस्यांचा समावेश आहे.

मुलायमसिंह यांनी मागील लोकसभा निवडणुकीत मैनपुरी आणि आझमगड या दोन मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढली होती. त्या निवडणुकीत मुलायमसिंह यादव यांनी दोन्ही ठिकाणी निवडणूक जिंकली होती. त्यानंतर त्यांनी मैनपुरी मतदारसंघ आपल्या मुलासाठी सोडत त्या ठिकाणचा राजीनामा दिला होता. यावेळी मात्र त्यांनी स्वतः या जागी निवडणूक लढण्याचे ठरवले असून या ठिकाणी मुलायमसिंह यांच्या यादव समाजाची ४ लाख मते असल्याने समाजवादी पक्षाचा उमेदवार या ठिकाणी निश्चित निवडून येतो. त्यामुळे मुलायमसिंह यांनी निश्चित विजयी होणाऱ्या जागी उमेदवारी करण्याचे ठरवले आहे.

मुलायम सिंह यांच्या सुनबाई खासदार डिंम्पल यादव यांच्या उमेदवारीची घोषणा अद्याप बाकी आहे. डिंम्पल यादव या कनौज लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढतात. त्यांच्या नावाची घोषणा पुढील यादीत होण्याची शक्यता आहे. त्यांच्या नावाच्या घोषणे बरोबर यादव परिवारातील ४ सदस्य लोकसभेचे उमेदवार असणार आहेत.

अशी आहे सपाच्या सहा उमेदवारांची यादी 

१. मुलायमसिंह यादव     – मैनपुरी

२. धर्मेंद्र यादव               – बंदायू
३. अक्षय यादव              – फिरोजाबाद
४. कमलेश कठेरिया      – इटावा
५. भाईलाल कोल          – रॉबर्ट्सगंज
६. शब्बीर वाल्मिकी       – बहराइच