कालव्यात आलेल्या सांबराला पकडले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – भिगवणहून कालव्याच्या मार्गाने हडपसरपर्यंत रात्रीच्या अंधारात आलेल्या सांबराला पकडण्यात अग्निशामक दलाच्या जवानांना दोन तासांच्या प्रयत्नानंतर यश आले. या सांबराची कात्रज येथील प्राणी संग्रहालयात रवानगी करण्यात आली आहे.

खडकवासला धरणातून दौंड, इंदापूरला मुठा डाव्या कालव्याद्वारे पाणी पुरवठा केला जातो. सध्या कालव्यातील पाणी बंद केल्याने कालवा कोरडा पडला आहे. दौंड, भिगवण भागात हे सांबर रात्रीतून कालव्यातून चालत थेड हडपसरपर्यंत आले. सकाळी  सातववाडी, उन्नतीनगर  परिसरात आले. कालव्यातून बाहेर आलेल्यावर तेथील एका मंदिराच्या परिसरात ते हिंडु लागले होते. आजू बाजूला सर्वत्र लोकवस्ती व लोकांचे आवाज येत असल्याने ते गोंधळून गेले होते. त्याला पाहण्यासाठी लोकांची एकच गर्दी जमली.

अग्निशामक दलाला याची माहिती मिळाल्यावर त्यांनी तेथे धाव घेतली. वन विभागाचे कर्मचारी, कात्रज प्राणी संग्रहालयाचे कर्मचारी आले. कात्रजच्या  रेस्क्यु सेंटरच्या अधिकाऱ्यांनी डॉट मारुन सांबराला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न केला. अखेर अग्निशामक दलाच्या जवानांनी दोन तासाच्या प्रयत्नानंतर त्याला जाळीमध्ये पकडले. त्याच्या तोंडाला थोडीशी जखम झाली असून त्याची कात्रज येथील प्राणी संग्रहालयात रवानगी करण्यात आली आहे.