अधुनिकीकरणाने निसर्गाचा मुडदा पाडला, महापुरावर बोलताना संभाजी भिडेंना अश्रू अनावर

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन – राज्यात महापुराचे थैमान सुरु आहे. कोल्हापूर, सांगलीतील घरेच्याघरे पाण्याखाली गेली आहेत. सर्व बाजूंनी या पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात येत आहे. पूराचे पाणी ओसरले आहे, परंतू लोकांचे संसार अस्तव्यस्त झाले. त्यामुळे सांगलीमधील हंडे-पाटील तालीम रोडमध्ये शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनी भेट दिली. तेव्हा त्यांनी निसर्गाच्या आपत्तीला आधुनिकीकरण जबाबदार असल्याचं सांगितले आहे.

महाराष्ट्रातून अनेकांची मदत येते मात्र अजून लोकांनी मदतीचा हात दिला पाहिजे. तसंच पाऊस किती पडला यावरून कोणाला दोष देता येणार नाही. निसर्ग हा अधिक बलवत्तर आहे. पाण्यामुळे आलेले हे आक्राळविक्राळ संकट आहे. यामुळे प्रशासनाला दोष देण्यात अर्थ नाही. त्यामुळे एकमेकांना दोष देण्यापेक्षा सर्वांनी एकत्र येत मदतकार्य केले पाहिजे.

अधुनिकीकरणाला जबाबदार धरताना लवासासिटीवर बोट दाखवत टीका केली. निसर्गाचा माणसानेच मुडदा पाडला आहे. त्यामुळे त्याचं रौद्ररुप पाहण्यास मिळतं. २००५ पेक्षा शंभरपटीने भीषण स्थिती सांगली कोल्हापुरात अनुभवयाला मिळत आहे. फक्त लवासाच नाही गावोगावी असाच निसर्गाचा मुडदा पडतो आहे, अशी टीका लोकांवरही त्यांनी केली आहे.

आता निसर्गाने रौद्ररुप घेतले असले तरी आता निसर्गाला आईच्या मायेनं सावरायला हवं, असंही त्यांनी यावेळी म्हटलं. हे बोलताना मात्र त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. खरंतर सांगली कोल्हापूरमध्ये फक्त लोकांचे नुकसान झाले नाही तर जनावरांचेही हाल झाले आहेत. त्यामुळे पूरस्थितीत जसे सगळेजण एकजूट करुन राहिले तसंच आता पुढच्या संकटांचा सामना करण्यासाठीही सगळ्यांनी एकत्र राहिलं पाहिजे, असं आवाहन संभाजी भिडे यांनी केलं आहे.

आरोग्यविषयक वृत्त

Loading...
You might also like