सांगली : पोलीसनामा ऑनलाईन – Sambhaji Bhide Guruji | सांगलीत शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांच्यावर कुत्र्याने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, सोमवारी रात्री संभाजी भिडे हे एका धारकऱ्याच्या घरी भोजनाच्या कार्यक्रमासाठी गेले होते. रात्री ११ वाजता ते माळी गल्ली परिसरातून जात असताना एका भटक्या कुत्र्याने त्यांच्यावर हल्ला केला. कुत्र्याने संभाजी भिडे यांच्या पायाला कडकडून चावा घेतला आहे. त्यानंतर त्यांना तातडीने नजीकच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्यांची प्रकृती ठिक असल्याचे समजते.
संभाजी भिडे यांचे वय सध्या ८० वर्षांपेक्षा जास्त आहे. ते सध्या सांगलीत वास्तव्याला असतात. १९८० च्या आसपास संभाजी भिडे यांनी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान ही संघटना स्थापन केली होती. सांगली, सोलापूर, सातारा, उत्तर कर्नाटकचा काही भाग, कोल्हापूर या भागात या संघटनेचे काम चालते. ‘शिवप्रतिष्ठान’कडून विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. त्यांची दुर्गामाता दौड आणि गड-किल्ल्यांवरील उपक्रम अनेकदा चर्चेचा विषय ठरतात.