किर्तनकार इंदुरीकर महाराजांना संभाजी भिडेंचा ‘पाठिंबा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – वारकरी संप्रदायाने इंदुरीकर महाराजांना पाठिंबा जाहीर दिल्यानंतर आता संभाजी भिडे यांनी देखील इंदुरीकर महाराजांना पाठिंबा जाहीर केला आहे. इंदुरीकर महाराज आणि त्यांच्या वक्तव्याचे संभाजी भिडेंच्या शिवप्रतिष्ठानकडून समर्थन करण्यात आले आहे. शिवप्रतिष्ठान संघटनेचे नितीन चौगुले यांनी यासंबंधित माहिती दिली आहे.

गेल्या काही दिवसांपासून किर्तनकार इंदुरीकर महाराज वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. त्यानंतर काहींकडून त्यांचे समर्थन होत आहे तर काहींकडून त्यांचा विरोध होत आहे. अशात आता संभाजी भिडे यांच्या शिवप्रतिष्ठान संघटनेने देखील यात उडी घेतली आहे. त्यांच्या संघटनेकडून किर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या ‘सम-विषम तारखांना स्त्रीसंग’ या वादग्रस्त विधानाचे समर्थन करण्यात आले आहे.

या विधानाने इंदुरीकर महाराजांवर ओढावला वाद –
इंदुरीकरांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला, “ज्यात त्यांनी किर्तनादरम्यान स्त्रीसंगवरुन सम विषमचं गणित मांडलं होतं. त्यात ते म्हणाले होते की स्त्रीसंग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते आणि स्त्रीसंग जर अशीव वेळेला झाला तर ती संतती रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत मिळवणारी होतात. जर टाईमिंग हुकला की क्वालिटी खराब होते.”

परंतु हे वक्तव्य गर्भलिंग निदान निवडीची जाहिरात असून पीसीपीएनडीटी (PCPNDT) कायद्याच्या कलम 22 चे उल्लंघन होत असल्याचा आरोप या पीसीपीएनडीटी सल्लागार समितीच्या सदस्यांनी केला आहे. त्यानुसार पीसीपीएनडीटी सल्लागार समितीने इंदुरीकर महाराजांना नोटीस पाठवून खुलासा मागितला आहे.