पुण्यात संभाजी भिडेंच्या समर्थनार्थ नदी पात्रात ठिय्या आंदोलन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन
कोरेगाव भिमा दंगल प्रकरणी मिलिंद एकबोटे यांना अटक करण्यात आली असून संभाजी भिडे यांना देखील अटक करण्यात यावी. अशी मागणी प्रकाश आबेंडकर यांनी मुंबईमध्ये एल्गार परिषद घेऊन मागणी केली होती. या मागणीचा शिवप्रतिष्ठान कडून निषेध व्यक्त करण्यात आला असून संभाजी भिडे गुरुजी यांच्या समर्थनार्थ राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यात लाल महाल ते जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार होता.

या मोर्चाला पुणे पोलिसांनी परवानगी नाकारल्याने शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी नदी पात्रात ठिय्या आंदोलन करीत खोटे गुन्हे मागे घ्यावे,मिलिंद एकबोटे यांची सुटका करावी.तसेच संभाजी भिडे यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यात येत आहे. अशा घोषणा देऊन निषेध व्यक्त केला.

यावेळी शिवप्रतिष्ठानचे पराश मोने म्हणाले की,”कोरेगाव भिमा प्रकरणी मिलिंद एकबोटे यांना अडकवण्यात आले असून संभाजी भिडे यांच्या अटकेची मागणी होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काल सखोल चौकशी नंतरच भिडे गुरुजींचा संबंध नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे सत्य समोर आले असून आम्ही भिडे गुरुजींच्या समर्थनार्थ मोर्चा काढणार होतो. मात्र पोलिसानी त्याला परवानगी नाकारली आहे. ही निषेधार्थ बाब असून आम्ही पोलिसांच्या सूचनांचे पालन करणार आहोत. या जागी ठिय्या मांडून निषेध व्यक्त करणार आहोत.” अशी भूमिका त्यांनी मांडली.

यावेळी मिलिंद एकबोटे यांच्या वहिनी ज्योत्स्ना एकबोटे म्हणाल्या की, ”भिमा कोरेगाव येथील दंगली प्रकरणी मिलिंद एकबोटे यांचा काही ही संबंध नसताना अडकवण्यात आले असून त्यांची सुटका करावी” अशी मागणी केली.

पुण्यात संभाजी भिडेंच्या समर्थनार्थ नदी पात्रात ठिय्या आंदोलन