संभाजी भिडे यांना हवी अनुपस्थित राहण्याची परवानगी 

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी नाशिक येथील एका सभेत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे महापालिकेने त्यांच्याविरुद्ध फौजदारी खटला दाखल केला आहे. या प्रकरणाची सुनावणी जिल्हा न्यायालयात झाली. यावेळी न्यायालयाच्या सुनावणीस अनुपस्थित राहण्याची परवानगी मिळावी, असा युक्तिवाद संभाजी भिडे यांच्यावतीने न्यायालयात करण्यात आला. वयोमान, तसेच संरक्षणावरील खर्च यामुळे भिडे यांनी ही परवानगी मागितली. या युक्तिवादास सरकार पक्षाने जोरदार विरोध केल्यानंतर अखेर या प्रकरणाची सुनावणी ४ जानेवारीला ठेवण्यात आली आहे.

न्यायालयाने ताकीद दिल्यानंतर मागील सुनावणीवेळी हजर राहिलेले संभाजी भिडे या सुनावणीला उपस्थित नव्हते. संशयितातर्फे ॲड. अविनाश भिडे यांनी युक्तिवाद केला. फिर्यादी पक्षाच्या म्हणण्यानुसार या प्रकरणातील सर्व पुरावे न्यायालयासमोर असून, भिडे यांनी दर सुनावणीला हजर राहणे आवश्यक नाही. त्यांचे वय, त्यांचे रहिवासाचे ठिकाण या बाबी, तसेच त्यांना पुरविण्यात येणारे संरक्षण आणि त्यासाठी होणारा खर्च लक्षात घेता अनुपस्थित राहण्याची सूट मिळावी, अशी विनंती त्यांनी न्यायालयाला केली.

ज्यावेळी आवश्यकता असेल, त्यावेळी संभाजी भिडे हजर राहतील, अशी हमीही बचाव पक्षाने दिली. यानंतर सरकार पक्षानेही याप्रकरणी युक्तिवाद केला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद संपल्यानंतर न्यायालयाने पुढील सुनावणी ४ जानेवारीला ठेवली आहे.