संभाजी ब्रिगेडनं आगामी विधानसभाच्या निवडणुकांसाठी उस्मानाबाद जिल्ह्यातून फुंकलं ‘रणशिंग’

उस्मानाबाद :  पोलीसनामा ऑनलाईन – आगामी विधानसभा निवडणुकीसाठी संभाजी ब्रिगेडने आज उस्मानाबाद जिल्ह्यातून प्रचाराला सुरुवात केली आहे. हजारो कार्यकर्त्यांनी शेकडो गाड्यांची रॅली काढून मोठं शक्तिप्रदर्शन करून कळंब येथे शेतकरी मेळावा घेण्यात आला. यावेळी जनसामान्यांच्या प्रश्नासाठी संभाजी ब्रिगेड राजकारणात उतरली आहे असे महाराष्ट्र राज्य व्यसनमुक्त संघटनेचे सचिव तथा संभाजी ब्रिगेडचे उस्मानाबाद-कळंब मतदारसंघाचे उमेदवार डॉ. संदीप तांबारे म्हणाले. नेत्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी आणि भल्यासाठी पक्षांतर केले आहे. जनसामान्यांच्या प्रश्नांकडे त्यांचे दुर्लक्ष करतात. शेतकरी दुष्काळाचा सामना करत असताना आपल्या यात्रेच्या माध्यमातून स्वतःचाच विकास आणि भले करण्यात सरकार व्यस्त आहे अशी टीका डॉ. संदीप तांबारे यांनी केली. जनसामान्यांच्या प्रश्नासाठी आम्ही लढणार आहोत आणि जनसामान्य व शेतकरी, कष्टकरी वर्ग आमच्या पाठीशी राहणार असे ते म्हणाले.
Sambhaji-Brigade-Osmanabad
या मुद्द्यांवर लढवणार निवडणूक
शेतकऱ्यांना हमीभाव, दारूमुक्त गाव, सर्वांना मोफत शिक्षण, आरोग्य, इत्यादी मुद्दे घेऊन मतदारसंघाच्या विकासासाठी संभाजी ब्रिगेडचे उमेदवार लढणार असल्याचे डॉ. संदीप तांबारे यांनी सांगीतले.

संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मनोज आखरे यांनी सांगितले की गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही राजकारण बघतो आहे. जो पर्यंत शेतकऱ्यांची पोरं राजकारणामध्ये येणार नाहीत तो पर्यंत शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार नाहीत. कारण शेतकऱ्याचे दुःख ज्यांनी सोसले असतील अशीच लोक शेतकऱ्यांचे प्रश्न व्यवस्थित मांडू शकतील. शेतकऱ्यांसाठी संभाजी ब्रिगेडने राजकीय भूमिका घेतली आहे, १०० पेक्षा अधिक उमेदवार या विधानसभा निवडणुकीत उभे करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या मेळाव्यासाठी संभाजी ब्रिगेडचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.