…अन्यथा ‘ठाकरे’ सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही, संभाजी ब्रिगेडचा इशारा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर आधारित ‘ठाकरे ‘ सिनेमा येत्या २५ जानेवारीला चित्रपटगृहात येणार आहे. या सिनेमाच्या ट्रेलर लाच सेन्सॉर ने कात्री लावली होती. त्यानंतर देखिल या चित्रपटाचा ट्रेलर आऊट झाला होता. आता या सिनेमाला संभाजी ब्रिगेडने विरोध दर्शवला आहे. या चित्रपटातील एका दृश्यातून संभाजी महाराजांचा अपमान करण्याचा प्रयत्न केला आहे. चित्रपटाच्या निर्माते,दिग्दर्शक यांनी जर त्या दृश्यात बदल केला नाही तर चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही असा इशारा संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक कपिल ढोके यांनी माध्यमांशी बोलताना दिला.

का आहे विरोध ?

“या सिनेमामध्ये अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका साकारत आहे. सिनेमामध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेला पायात पादत्राणं घालून पुष्पहार अर्पण करतांना दिसत आहे. छत्रपती संभाजी महाराज हे उभ्या महाराष्ट्राची अस्मिता असून सिनेमातील हे दृश्य छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान करणारे आहे. सिनेमातील हे दृश्य निर्माता आणि दिग्दर्शक यांनी  तात्काळ वगळावे अन्यथा या दृश्यासह सिनेमा जर  प्रदर्शित करण्याचा प्रयत्न केला तर संभाजी ब्रिगेड महाराष्ट्रात  एकाही ठिकाणी हा सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही, असा इशारा संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र राज्य प्रदेश संघटक कपिल  ढोके यांनी दिला आहे.

पुढे ढोके असंही म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांचे कर्तृत्व मोठे आहे. त्यांच्या कर्तृत्वाला आणि त्यांच्या सिनेमाला विरोध असण्याचं काही कारण नाही. परंतु या सिनेमातून निर्माते आणि दिग्दर्शक यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान करण्याचा प्रयत्न केला आहे. हे कदापी खपवून घेतले जाणार नाही. त्यामुळे लवकरात लवकर हे दृश्य वगळण्यात यावे. अन्यथा महाराष्ट्रातल्या एकाही सिनेमागृहामध्ये हा सिनेमा संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते प्रदर्शित होऊ देणार नाहीत,असेही त्यांनी सांगितले.