पुणे : संभाजी उद्यानात ‘त्यांनी’ बसविलेला पुतळा पोलिसांनी हटविला ; पुण्यात प्रचंड खळबळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा डेक्कन जिमखान्यावरील संभाजी उद्यानात बसविण्यात महापालिका टाळाटाळ करीत असल्याचे पाहून काही शंभुप्रेमीनी रात्रीत उद्यानातील चौथऱ्यावर एक छोटा पुतळा आणून बसविला. ही बाब मंगळवारी सकाळी लक्षात आली. त्यानंतर काही वेळाने पोलिसांनी हा पुतळा हटविला.

पुण्यातील छत्रपती संभाजी उद्यानात महापालिकेकडून छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा बसविण्यात येणार आहे. त्यासाठीच काम आणि चौथरा बांधून पूर्ण झाले आहे. एवढंच नव्हे तर जो पुतळा बसविण्यात येणार आहे. तो पुतळा देखील तयार आहे. पण महापालिका तो बसविण्यास टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे काल मध्यरात्री अचानक काही जणांनी संभाजी उद्यानातील चौथऱ्यावर संभाजी महाराजांचा एक छोटा पुतळा नेऊन ठेवलाय. हा पुतळा इथे नेऊन ठेवणाऱ्या गणेश कारले नावाच्या तरुणाने त्या पुतळ्यासोबत सेल्फी घेतलाय आणि हा पुतळा इथून हलवल्यास गंभीर परिणाम होतील अशा आशयाचा मजकूर लिहिलेला कागद चौथऱ्यावर चिकटवलाय. खरे तर महापालिकेकडून बसवण्यात येणारा पुतळा भव्य असुन छत्रपती संभाजी महाराज बुधभूषण ग्रंथाची रचना करतानाची प्रतिमा त्यातुन साकारण्यात आलीय. येत्या काही दिवसांत या पुतळ्याचे अनावरण करण्याची तयारी महापालिकेकडून सुरू आहे. त्यासाठी आवश्यक त्या परवानग्या देखील मिळवण्यात आल्या आहेत.

याच उद्यानातील राम गणेश गडकरी यांचा पुतळा दोन वर्षांपूर्वी काढून टाकण्यात आला होता. त्यानंतर संभाजी उद्यानात महापालिकेकडून चोवीस तास सुरक्षारक्षक ठेवले जातात. मात्र तरीही चौथऱ्यावर हा पुतळा नेऊन ठेवल्याने खळबळ उडालीय.

याबाबत संभाजी बिग्रेडचे संतोष शिंदे यांनी सांगितले की, छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा तयार आहे. त्याबाबत बैठक घेण्याचे महापालिका आयुक्तांनी महापौरांना पत्रही पाठविले आहे. असे असताना ही बैठक होत नाही. शंभुप्रेमींनी या ठिकाणी चौथऱ्यावर पुतळा बसविला याचा अभिमान आहे. हा पुतळा आता हलवू नये. महापालिकेने तातडीने नवीन पुतळा त्या ठिकाणी बसवावा. तोपर्यंत हा पुतळा हलवू नये.

ही बाब लक्षात आल्यावर पोलिसांनी हा छोटा पुतळा तेथून हलविला आहे. शिवजयंतीच्या दिवशी हा प्रकार घडल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.