माझ्या अपमानापेक्षा समाजाचे काम मार्गी लागले हे महत्त्वाचे : खा. संभाजीराजे

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – सारथी संस्थेबाबतच्या वादावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारनं आयोजित केलेल्या बैठकीत आसन व्यवस्थेवरून झालेल्या मानपमान नाट्यावर भाजप खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माझ्या अपमानापेक्षा समाजाचे काम मार्गी लागलं हे महत्त्वाचे, अशी प्रतिक्रिया खासदार संभाजीराजे यांनी व्यक्त केली आहे.

खासदार संभाजी राजे यांनी ट्विटरवरून ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आपण रयतेचे सेवक आहोत, हे छत्रपती घराण्याचे संस्कार आहेत. स्वत:पेक्षा रयतेला महत्त्व देणारे उज्ज्वल विचार असलेले माझे घराणे आहे. त्यामुळे समाज हित हीच माझी प्राथमिकता आहे. छत्रपती घराण्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या शिवभक्तांना मी सांगू इच्छितो की, महाराष्ट्रात कुणीही एवढा मोठा नाही, जो छत्रपतींच्या घराण्याचा अपमान करेल, असं सांगतानाच समाजाने सारथीचा जो लढा उभा केला होता, मराठा समाजाच्या ज्या मागण्या होत्या त्याच्या पूर्णतेची सकारात्मक सुरुवात झाली हे महत्त्वाचे, असे संभाजीराजे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

दोन तासात आठ कोटी रुपयांचा निधी मिळवता आला. सर्व मागण्या मान्य करुन घेता आल्या ही समाजाची ताकद आहे. हा मराठा समाजाचा विजय आहे. समाजात एकी असली की सर्व काही करुन घेता येते. स्वायत्ता आणि सक्षम सारथी मराठा समाजातील गरीब गुणवंत युवकांच्या जीवनात क्रांती घडवेल, असंही त्यांनी म्हटलं आहे.