‘संभाजीनगर चुकून टाइप झाल; CMO चे ट्विटर हॅंडल करणार्‍याला आम्ही समज देऊ’ ! कॉंग्रेस नेते अस्लम शेख यांच्याकडून पाठराखण

मुंबईः पोलीसनामा ऑनलाईन – राज्यात गेल्या काही दिवसांपासून औरंगाबादच्या (Aurangabad) नामांतरणावरुन राजकराण तापले आहे. कॉग्रेसने (Congress) औरंगाबादच्या नामांतरणाला स्पष्ट विरोध असल्याचे जाहीर केले आहे. असे असतानाही मंत्रीमंडळ निर्णयाच्या माहिती देताना मुख्यमंत्र्यांच्या ट्विटर हँडलवर औरंगाबादच्या उल्लेख संभाजीनगर असा केला आहे. यामुळे महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडली आहे. यावर कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे त्यांच्याच पक्षाचे मंत्री आणि मुंबईचे पालकमंत्री असलेल्या अस्लम शेख यांनी मात्र ‘कधीतरी टाइप करताना चूक होत असते. त्यामुळे CMO चे ट्विटर हॅंडल करणाऱ्या व्यक्तीला आम्ही समज देऊ, असे म्हणत यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. ते एका मराठी वृत्वाहिनीशी बोलत होते.

 

 

मुंबईत बुधवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत काही महत्वाचे निर्णय घेतल्याची माहिती मुख्यमंत्र्यांच्या ट्विटर हँडलवर दिली आहे. विशेष म्हणजे, काँग्रेसचे मंत्री अमित देशमुख यांच्या खात्याच्या निर्णयात औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा उल्लेख केला आहे. यावर प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी 3 ट्विट करत नाराजी व्यक्त केली होती. यानंतर आता ”कधीतरी टाइप करताना चूक होत असते. त्यामुळे CMO चे ट्विटर हॅंडल करणारऱ्या व्यक्तीला आम्ही समज देऊ, असे मुंबईचे पालकमंत्री आणि काँग्रेसचे नेते अस्लम शेख यांनी म्हटले आहे.

 

औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व कर्करोग रुग्णालयात रुग्ण खाटा वाढविणे तसेच नव्याने 360 पदे निर्माण करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी दिली आहे. या संदर्भातील ट्वीट CMO च्या हँडलवर केले आहे. त्यात संभाजीनगर असा उल्लेख केला होता. त्यानंतर महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार हे किमान समान कार्यक्रमावर चालते आहे. आम्ही पुन्हा ठणकावून सांगतो, सामाजिक सलोखा टिकून राहावा यासाठी कोणत्याही शहराच्या नामांतरणाला आमचा ठाम विरोध आहे, असे थोरात यांनी सांगितले. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने (@MahaDGIPR) शहरांचे परस्पर नामांतरण करू नये. शहराचे नामांतर करणे हा महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमाचा भाग नाही. छत्रपती संभाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आहेत. त्यांच्या नावाचा वापर करून नामांतराचे राजकारण खेळू नये, आपण सर्व मिळून औरंगाबादच्या विकासासाठी काम करूया, असे आवाहन देखील थोरात यांनी केला आहे.