शिवप्रेमींचे तब्बल 23 कोटी रूपये दलालीसाठी द्यायचे का ? खा. छत्रपती संभाजीराजेंचा ‘सवाल’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली असून या भेटीत छत्रपती संभाजीराजेंनी रायगड किल्ल्यावर परवानगी नसताना देखील रोप-वेचं काम सुरु आहे याबाबत नाराजी व्यक्त केली. त्यावर तोडगा काढण्याबाबत चर्चा करून हा भ्रष्टाचार थांबविण्यात यावा असे संभाजीराजेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सांगितले.

संभाजीराजेंनी स्पष्ट केले की, मागील वेळी सरकारने रायगड संवर्धनासाठी ७०६ कोटी रुपये दिले होते. रायगड ही शिवाजी महाराजांची राजधानी आहे. परंतु गेली दोन वर्षात एक टक्काही काम येथे झालेले नाही. राजधानीच्या विकासकामासाठी १६.५० टक्के कमिशन दिले जाणार आहे. म्हणजेच शिवभक्तांचे २३ कोटी रुपये फक्त दलाली म्हणून द्यायची का? असा सवाल संभाजीराजेंनी आपल्या भेटीदरम्यान मुख्यमंत्र्यांना केला.

संभाजीराजेंनी मुख्यमंत्र्यांना विनंती केली की, असे काम होणार असेल तर मला या जबाबदारीमधून मुक्त करा. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रायगड संवर्धनाचे काम संभाजीराजेंनीच करावे. हे काम त्यांच्याशिवाय दुसरे कुणी करू शकणार नाही, असे सांगितले. मुख्यमंत्र्यांनी त्यांना आश्वासन दिले की रायगडाबाबत कुठलीही चुकीची गोष्ट खपवून घेतली जाणार नाही. तसेच कुठल्याही गैरकारभाराकडे दुर्लक्ष न करता त्याबाबत अधिकाऱ्यांना योग्य ती समज दिली जाईल. याचबरोबर, सारथी संस्थेची स्वायत्तता आणि सर्वोच्च न्यायालयातील मराठा आरक्षणाचा लढा याबाबतही मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाल्याचे खासदार संभाजीराजे यांनी स्पष्ट केले.

रायगड प्राधिकरणाच्या बैठकीनंतर अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत संभाजीराजे म्हणाले की, ‘रोप-वे चा जो काही मनमानी कारभार चालू आहे, तो जर असाच चालू राहिला तर आपल्याला वेगळा विचार करावा लागेल’ असा इशाराही त्यांनी दिला.’

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/