उदयनराजेंच्या पराभवाबाबत खासदार संभाजीराजे म्हणाले….

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देवून भाजपमध्ये गेलेल्या उदयनराजे भोसले यांचा सातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीत पराभव झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे श्रीनिवास पाटील यांनी उदयनराजेंचा पराभव केला. उदयनराजेंच्या पराभवानंतर छत्रपती खासदार संभाजीराजे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

खा. संभाजीराजे म्हणाले, छत्रपती उदयनराजेंचा पराभव म्हणजे आमचा पराभव आहे. त्यांच्या पराभवामुळं आम्हाला मनापासून दुःख झालं आहे. मात्र, सुख-दुःख पाहण्याची छत्रपती घराण्याची सवय आहे. आजचा पराजय हा उद्याचा विजय कसा असेल ? याचा छत्रपती उदयनराजे नक्की विचार करत असतील. पद हा एक भाग आहे, मात्र छत्रपतींची पदवी ही महत्वाची असते, रयतेची सेवा करणं ही छत्रपती घराण्याची परंपरा आहे.

पुढे बोलताना खा. संभाजीराजे म्हणाले, एक तरी कॅबिनेटची बैठक ही रायगडावर घ्यावी अशी माझी विनंती आगामी मुख्यमंत्र्यांना असेल. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत निवडुन आलेल्या आमदारांबद्दल खा. संभाजीराजे म्हणाले, गावाचा विकास करायचा असेल तर प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांना समजून घ्या, त्यासाठी रायगडावर जाऊन नतमस्तक व्हा, फक्त जयजयकार करून चालणार नाही.

दरम्यान, उदयनराजेंचा सातार्‍यातून पराभव होईल असे भाजपाला देखील वाटले नव्हते. त्यावर प्रतिक्रिया देताना भाजपाच्या अनेक बडया नेत्यानी हा पराभव अनपेक्षित असल्याचं यापुर्वीच सांगितलं आहे.

Visit : policenama.com