मुंबईतील वांद्रे सारखा प्रकार ! परप्रांतीय मजुरांना भडकविण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांवर FIR

पनवेल :  पोलीसनामा ऑनलाइन –   वांद्रे स्टेशनबाहेर मंगळवारी परप्रांतीय मजुरांची मोठी गर्दी झाली होती. आम्हाला गावी जायचे आहे, असे सांगत या मजुरांनी त्या ठिकाणा ठिय्या मांडला. ट्रेन सुरु होणार आहेत, अशी अफवा पसरल्यानंतर ही गर्दी जमा झाली होती. यानंतर पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज करून गर्दी कमी केली. वांद्रे प्रकरणाशी साधर्म्य प्रकार कामोठेत देखील घडल्याने कामोठे पोलिसांनी स्वयंघोषित समाजसेवक कमलेश दुबे (वय-26) आणि महम्मद अन्सारी (वय-46) या दोघांना बुधवारी अटक केली आहे.

दुबे आणि अन्सारी या दोन आरोपींनी परप्रांतीय मजुरांना पुरेसे अन्न, धान्य मिळत नाही, मजुरांना मोठे हाल सहन करावे लागत असून परप्रांतीय मजुरांच्या भावना भडकविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोघांना अटक केली. यावेळी शासनाच्या जमावबंदीचा आदेश झुगारून पाच पेक्षा जास्त कामगारांना एकत्र केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे आरोपींनी मजुरांच्या भावना भडकविणाऱ्या वादग्रस्त चित्रफित व्हायरल केले. आरोपींनी मजुरांना शासनाविरोधात भडकवित शांतता भंग केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त रवींद्र गिड्डे यांच्या आदेशाने कामोठे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबासाहेब तुपे यांनी गुन्हा दाखल केला आहे.