शासकीय कर्मचाऱ्याचा प्रताप : एकाच ‘आधार’मुळे दोघे निराधार

नाशिक : पोलीसनामा आॅनलाइन – सरकारी काम आणि सहा महिने थांब असे आपण नेहमीच शासकीय कामाबाबत बोलतो. मात्र, शासकीय कर्मचाऱ्यांनी केलेल्या चूकांमुळे कधीकधी सर्वसामान्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. सध्या असाच प्रकार नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील कुंडाणे येथे घडला आहे. या गावातील दोन व्यक्तींना एकच आधारकार्डचा एकच क्रमांक असल्याने दोघांनाही प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यांचे कोणतेच शासकीय काम मार्गी लागत नसल्याने दोघांवरही डोक्याला हात लावण्याची पाळी आली आहे. अजूनही शासकीय यंत्रणांनी त्यांना अशाच परिस्थितीत झुलवत ठेवले आहे. विशेष म्हणजे या दोघांपैकी एकजण हा महाविद्यालयीन विद्यार्थी आहे.

आधार यंत्रणेच्या या सदोष कार्यप्रणालीचा फटका अनेकांना बसत असल्याने या यंत्रणेच्या कार्यपद्धतीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शासनाने आधार कार्डची सक्ती केलेली आहे. प्रत्येकास स्वतंत्र आधार क्रमांक मिळत असल्याने तो क्रमांकच त्या व्यक्तीची ओळख ठरत आहे. असे असताना नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील कुंडाणे (ओ) येथील वेदांत हिरामण देवरे व उत्तम शिवाजी पवार या दोघांच्या आधार कार्डवर एकच क्रमांक असल्याने दोघांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. दोघांचे बँक व्यवहार तसेच इतर शासकीय कामांमध्ये हा आधार क्रमांक अडथळा ठरत आहेत. आधार यंत्रणेच्या या करामतीमुळे पवार व देवरे त्रस्त झाले आहेत. यासंबंधी पवार व देवरे यांनी हेल्पलाइनवर वेळोवेळी संवाद साधला; मात्र या यंत्रणेकडून कुठल्याही प्रकारची ठोस माहिती दिली जात नाही. पवार यांनी आधी आधार कार्ड काढले असून, देवरे यांचे आधार कार्ड नंतरचे आहे. आधार यंत्रणेकडून पवार यांना नवीन कार्ड काढण्याचा सल्ला दिला गेला.

आश्चर्य म्हणजे पॅनकार्ड बदलण्याचा सल्लाही दिला गेल्याचे त्यांनी सांगितले. यासंबंधी वारंवार तक्रारी देऊनही आधार यंत्रणा दुर्लक्ष करत आहे. याबाबत उत्तम पवार म्हणाले की, आधार कार्डवरील एकच क्रमांकामुळे कुठलेही काम होत नाही. दरवेळी स्टॅम्पपेपरवर प्रतिज्ञापत्र सादर करावे लागते. स्टॅम्पसाठी आतापर्यंत हजारो रुपये खर्च झाले आहेत. नवीन आधार कार्ड काढण्याचा सल्ला देऊन ही यंत्रणा मोकळी होते. आधार यंत्रणेच्या गलथान कारभारामुळे प्रचंड मन:स्ताप होत असून ही चूक करणाऱ्यांवर कारवाई करावी व आमची समस्या सोडवावी. तर वेदांत देवरे याने सांगितले की, मी महाविद्यालयीन शिक्षण घेत असून कागदपत्रांच्या पूर्ततेवेळी किंवा बँकेत काही काम असेल, तर या आधार कार्ड क्रमांकामुळे ते होत नाही. शिष्यवृत्तीही रखडते. यंत्रणेच्या गलथान कारभाराची शिक्षा आम्हाला भोगावी लागत आहे.