स्टँडअप कॉमेडियला बलात्काराची धमकी देणार्‍यावर दिग्दर्शक संतप्त

पोलिसनामा ऑनलाईन – छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याबद्दल स्टँडअप कॉमेडियन अग्रिमा जोशुआने जाहीर माफी मागितली आहे. मात्र यानंतरही सोशल मीडियावर तिच्यावर जोरदार टीका होत आहे. एका नेटकर्‍याने तिला बलात्काराची धमकीच दिली आहे. यावर ‘धुरळा’ चित्रपटाचे दिग्दर्शक समीर विद्वांस यांनी संताप व्यक्त केला आहे. ‘आज महाराज असते तर याला जबर शिक्षा केली असती. याला ताबडतोब अटक आणि शिक्षा व्हायलाच हवी,’ असे ट्विट त्यांनी केले आहे.

व्हिडीओ पोस्ट करत अग्रिमाचा बलात्कार करण्याची धमकी दिली आहे. हा व्हिडीओ शेअर करत बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करने त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. स्वराचे ट्विट शेअर करत समीर विद्वांस यांनी राग व्यक्त केला आहे. ‘त्या मुलीने माफी मागितली आहे. पण हा माणूस किती गलिच्छ आहे. बलात्काराची धमकी देत आहे. त्या मुलीबद्दल इतक गलिच्छ बोलून शेवटी महाराजांचे नावही घेतोय. लाजही वाटत नाही. आज महाराज असते तर याला जबर शिक्षा केली असती. याला ताबडतोब अटक आणि शिक्षा व्हायलाच हवी,’ ट्विटमध्ये त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना टॅग केले आहे. दरम्यान, स्टँडअप शोदरम्यान अग्रिमा जोशुआने छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील प्रस्तावित पुतळ्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले होते. जोशुआचा हा व्हिडीओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला असून अनेक शिवप्रेमींनी तिच्यावर कठोर शब्दात टीका करत तिच्या वक्तव्याचा निषेध केला आहे.