आदित्य ठाकरेंना ‘बेबी पेंग्विन’ म्हणणाऱ्याला अटक, अमृता फडणवीसांनी केली होती पाठराखण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याचे पर्यावरण व पर्यटन मंत्री आणि शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे (shivsena leader Aditya Thackeray) यांना बेबी पेंग्विन म्हणणारा समित ठक्कर (smit thakkar) याला पोलिसांनी अटक केली आहे. मुंबई आणि नागपूर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. आरोपी समित ठक्कर हा नागपूरचा रहिवासी असून त्यानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केली होती.

समित ठक्कर याला रविवारी पोलिसांनी राजकोट येथे अटक केली. आरोपीला आज (सोमवार) नागपूर कोर्टात हजर करण्यात येणार आहे. समित यानं ट्विट करुन आदित्य ठाकरे यांना ‘बेबी पेंग्विन’ म्हणून खोचक टीका केली होती.

अमृता फडणवीसांनी केली पाठराखण

आरोपी समित ठक्करचे ट्विटरवर हजारो फॉलोअर्स आहेत. त्याची फॉलोअर्सची संख्या 60 हजारांच्या वर आहे. तर भाजपचे अनेक मातब्बर नेते सुद्धा समित ठक्करला ट्विटरला फॉलो करतात. यात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा देखील समावेश आहे. एवढंच नाही तर समित ठक्कर याचं नाव समोर आल्यानंतर अमृता फडणवीस यांनी देखील त्याची पाठराखण केली होती.

दरम्यान युवा सेनेचे पदाधिकारी धमेंद्र मिश्रा यांनी समित ठक्कर याच्या विरोधात पोलिसांनी तक्रार केली होती. आरोपी समित हा भाजपचा आयटी सेलचा कार्यकर्ता आहे, असा दावा धर्मेंद्र मिश्रा यांनी केला आहे. धमेंद्र मिश्रा यांनी मुंबई हाय कोर्टात याचिका दाखल केली. या याचिकेवर 1 ऑक्टोबर 2020 रोजी हायकोर्टाने समित याला पोलिसांसमोर हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर समित 5 ऑक्टोबर रोजी व्ही. पी. पोलीस स्टेशन येथे तपास अधिकाऱ्यांसमोर दखल झाला. मात्र, काही वेळातच तो बाथरुमला जातो, असं सांगून त्याने तेथून पळ काढला होता.

सायबर सेलकडूनही तक्रार दाखल

सायबर पोलिसांनी समित याच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. कोर्टाने सुरुवातीला समित ठक्कर याला त्याचा लॅपटॉप, मोबाईल पोलिसांसमोर सादर करण्याचे आदेश दिले होते. मात्र, त्याने कोर्टाच्या आदेशाचं पालन केलं नाही. ही बाब कोर्टाच्या लक्षात आणून दिल्यावर कोर्टाने पुन्हा आरोपी समित याला वी.पी.रोड पोलीस स्टेशन आणि सायबर क्राईम पोलीस स्टेशन येथे जाऊन तपास अधिकाऱ्यांना सहकार्य करण्याचे आदेश दिले.

समित याला हे आदेश 16 ऑक्टोबर रोजी दिले. मात्र, त्याने हा गुन्हा रद्द करावा म्हणून नागपूर हाय कोर्टात याचिका दाखल केली. हाय कोर्टाने ती याचिका फेटाळून लावली. यानंतर शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात सोशल मीडियावर वारंवार आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या समित ठक्कर याला नागपूर पोलिसांनी अटक केली आहे.

You might also like