‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग’ च्या नामकरणावर अखेर ‘शिक्कामोर्तब’

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – राज्य सरकारच्या महत्त्वकांक्षी समृद्धी महामार्गाच्या नामकरणावर अखेर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचे ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग’ असे नामकरण करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासंदर्भातील शासन निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाने आज (शुक्रवार) जीआर जारी केला आहे.

समृद्धी महामार्गाला भाजपकडून दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्याचा आग्रह होता. तर शिवसेनेने बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्यावे अशी मागणी केली होती. अखेर आता महाविकास आघाडीचे सरकार राज्यात आल्यानंतर समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच या प्रकल्पासाठी राज्य शासनाच्या वतीने साडेतीन हजार कोटी रुपयांची रक्कम भागभांडवली अनुदान म्हणून देण्याचा मंत्रिमंडळाच्या निर्णयाचाही शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाच्या रुपाने महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण देशात द्रुतगती महामार्गाची मुहूर्तमेढ शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी रोवली होती. बाळासाहेबांच्या संकल्पनेतून साकारलेल्या आणि तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांनी पूर्णत्वास नेलेल्या या द्रुतगती महामार्गाने पुणे शहरातील उद्योग, सेवाक्षेत्र, शिक्षणक्षेत्रात अमुलाग्र परिवर्तन घडवून शहरांचा विकास केला आहे. त्याच धर्तीवर नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/