राज्यात नवा वाद ! बाळासाहेब ठाकरे की अटलबिहारी वाजपेयी ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई- नागपूर द्रुतगती समृद्धी महामार्गाचा प्रकल्प पुन्हा एकदा अडचणीत येण्याची शक्यता आहे. भाजपचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प असल्याने या महामार्गाला माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्याचा प्रस्ताव पक्षाने मांडला होता. मात्र, आता त्याऐवजी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव या समृद्धी महामार्गाला देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मिळाली असून या संबंधीची घोषणा लवकरच करण्यात येईल, असंही म्हटलं जात आहे.

या नव्या समृद्धी महामार्गामुळे मुंबई आणि नागपूर या दोन शहरांमधील ७१० किमी अंतराचा प्रवास अवघ्या ६ तासात करता येणार आहे. या प्रकल्पासाठी सुमारे ५६ हजार कोटी रुपये खर्च होणार असून तीन वर्षात या महामार्गाचे बांधकाम पूर्ण करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. १० जिल्ह्यातील २७ तालुक्यातल्या ३५० गावांमधून हा महामार्ग जोडला जाणार आहे. हा प्रकल्प उभारण्याची घोषणा तत्कालीन फडणवीस सरकारमध्ये करण्यात येणार होती. त्यामुळे या महामार्गाला माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्याची घोषणा केली होती. मात्र राज्यात सत्तांतर झाल्याने आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने बाळासाहेब ठाकरेंचे नाव देण्याचं निश्चित केलं असल्याची माहिती समजली आहे.

दरम्यान, या प्रकल्पाच्या घोषणेनंतर शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला होता. शिवसेनेनेसुद्धा या प्रकल्पाविरुद्ध भूमिका घेत शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारा हा प्रकल्प असल्याचे म्हटले होते. मात्र त्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांचे नाव समृद्धी महामार्गाला देण्यात यावे अश्या मागणीला सुरुवात झाली. याच पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी मंत्रीमंडळ बैठकीवेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना नेत्यांसोबत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. शिवसेनाप्रुख बाळासाहेब ठाकरे हे देशात पहिल्या पुणे-मुंबई द्रुतगती मार्गाचे शिल्पकार आहेत. त्यामुळे या समृद्धी महामार्गालादेखील बाळासाहेबांचेच नाव देण्यात यावे, अशी मागणीही होत गेली. त्यानंतर नावाचा वाद निर्माण झाला होता.

दरम्यान, शिवसेनेच्या मागणीनंतर आधीच या महामार्गाला अटलबिहारी वाजपेयींचे नाव देण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे आता वाद कशाला? असा सवाल करत दबावाचं राजकारण करू नका, अश्या शब्दात फडणवीस यांनी शिवसेनेच्या नेत्यांची हजेरी घेतली होती. मात्र त्यावेळी, या नावाच्या वादावरून फडणवीसांना राजीनामा देण्याचा इशाराही शिवसेनेनं दिला होता.