4000 mAh बॅटरी आणि ट्रिपल रिअर कॅमेर्‍यासह लॉन्च झाला Samsung Galaxy A11

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : आज सॅमसंगने आंतरराष्ट्रीय बाजारात अजून एक कमी बजेट असणारा स्मार्टफोन अधिकृत केला आहे. कंपनीकडून हा फोन ‘गॅलेक्सी ए’ सिरीजमध्ये जोडण्यात आला असून तो Samsung Galaxy A11 नावाने बाजारात उपलब्ध करण्यात आला आहे. गॅलेक्सी A11 सॅमसंगचा सर्वात स्वस्त पंच-होल डिस्प्ले असणाऱ्या स्मार्टफोनपैकी एक आहे.

सॅमसंग गॅलेक्सी A11 ला कंपनीकडून व्हिएतनाममध्ये सादर करण्यात आले आहे. सॅमसंगने आपल्या वेबसाइटवर फोनचे प्रॉडक्ट पेज तयार करून त्यास अधिकृत केले आहे. जरी कंपनीकडून फोनच्या किंमतीबाबत अजून काही सांगण्यात आलेले नाही, परंतु हे निश्चित आहे की सॅमसंग कमी बजेटमध्ये गॅलेक्सी A11 लॉन्च करणार आहे. सॅमसंग गॅलेक्सी A11 ला अँड्रॉइडचे नवीनतम ओएस अँड्रॉइड 10 वर सादर करण्यात आले आहे. तसेच हा स्मार्टफोन सध्या व्हिएतनाममध्ये सेलसाठी उपलब्ध करण्यात येईल आणि त्यांनंतर भारतात आणि इतर देशातील बाजारात उपलब्ध करण्यात येणार आहे.

फोटोग्राफी सेगमेंटबद्दल बघितले तर सॅमसंग गॅलेक्सी A11 ट्रिपल रीअर कॅमेरा सपोर्ट करतो. फोनच्या मागील पॅनेलवर फ्लॅश लाइटसह 13 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे. फोनमध्ये 5 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड सेन्सर आणि 2 मेगापिक्सल डेप्थ सेन्सर आहे. सेल्फीसाठी हा फोन 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा सपोर्ट करतो. पॉवर बॅकअपसाठी हा फोन 15W फास्ट चार्जिंग सपोर्ट असणाऱ्या 4,000 एमएएच च्या मोठ्या बॅटरीला सपोर्ट करतो. सॅमसंग गॅलेक्सी A11 हा ड्युअल सिम फोन आहे जो 4G VoLTE सपोर्ट करतो.