सॅमसंगचा निष्काळजीपणा, कर्मचाऱ्यांना कॅन्सर  

सोल : वृत्तसंस्था – जगभरातील घरांमध्ये हक्काचं स्थान मिळवलेल्या सॅमसंग कंपनीला कर्मचाऱ्यांकडे केलेल्या दुर्लक्षाची मोठी किंमत मोजावी लागली आहे. आपली रोजची कामं सुकर करणारी उत्पादनं सॅमसंग कंपनी बनवते. परंतु, सेमी कंडक्टर आणि एलसीडी कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आवश्यक सुविधा न पुरवल्यानं त्यांचं जगणं धोक्याचं  बनलं  काही कर्मचाऱ्यांना कॅन्सरसारख्या दुर्धर आजारानं ग्रासलं होतं. त्या सर्वांना ९५ लाख रुपयांची भरपाई देण्याचा निर्णय व्यवस्थापनानं घेतला आहे आणि त्यांची माफीही मागितली आहे.
सॅमसंगच्या फॅक्टरीत काम करणाऱ्या शेकडो कर्मचाऱ्यांना विविध आजाराने ग्रासल्याचे  प्रकरण २००७ मध्ये समोर आलं होतं. कामाच्या ठिकाणी – विशेषतः सेमीकंडक्टर आणि डिस्प्ले फॅक्टरीमध्ये काम करताना कामगारांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. परंतु, तशी कुठलीच व्यवस्था सॅमसंग कंपनी कडे नसल्याचा दावा कामगारांच्या कुटुंबीयांनी केला होता. त्यामुळेच कामगारांना  विविध आजारांनी ग्रासल्याची तक्रार करत तेथिल कर्मचारी संघटनांनी कोर्टात धाव घेतली होती. सॅमसंग कंपनीच्या निष्काळजीपणामुळे सुमारे २४० कर्मचाऱ्यांना आजारपणाला सामोरे  जावे लागले  आहे तर ८०  कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर, आजारी कर्मचाऱ्यांच्या बाजुने लढा देणाऱ्या संघटनेने बलाढ्य अशा सॅमसंग कंपनीविरुद्ध न्यायालयात धाव घेतली. विशेष म्हणजे काही दावेदार तर १९८४  पासून रोगाने त्रस्त आहेत. मात्र, त्यांनी कंपनीविरुद्ध आपली लढाई सुरूच ठेवली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या लढ्यापुढे शरण येत कंपनीने याच महिन्यात कर्मचाऱ्यांना मदत देण्याची घोषणा केली. त्यानुसार कंपनीकडून प्रत्येक पीडित कर्मचाऱ्यास १. ३३ लाख डॉलर (९५  लाख रुपये) नुकसानभरपाई देण्याचे ठरवले आहे.
कंपनीने देऊन केलेल्या रकमेला आणि माफीला काही कर्मचाऱ्यांनी नकार दिला आहे. आपल्या मुलीला कायमचं गमावणारे हवांग सैन-गीन यांनी आपण ही माफी स्विकारत नसल्याचे म्हटले आहे. दरम्यान, सॅमसंग ही इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील आघाडीची कंपनी असून मोबाईल आणि चीप बनविण्याचे काम ही कंपनी करते. तर, देशातील ११  वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या दक्षिण कोरियाच्या अर्थव्यवस्थेत सॅमसंगचा दबदबा आहे.