बॉलिवूडमध्ये आदित्य ठाकरेंचे अनेक मित्र, पण…

पोलिसनामा ऑनलाईन – अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात भाजपने राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधत बेछुट आरोप केले. आरोपावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी रोखठोक सवाल करत सडकून टीका केली आहे. ’दिनो मोरिया व इतर सिनेनट हे राज्याचे मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मित्र परिवारातले आहेत. पुराव्याशिवाय बोलणे व आरोप करणे हे नैतिकतेस धरून नाही. पुरावे आहेत काय? ’ असा थेट सवाल राऊतांनी विचारला आहे. सामनाच्या रोखठोक सदरात त्यांनी या प्रकरणावरुन भाजपवर जोरदार प्रहार केला आहे.

’गोध्रा दंगल, त्या निमित्ताने झालेल्या हत्यांचा तपास सीबीआयकडे जाऊ नये, कारण सीबीआय म्हणजे केंद्रीय सत्ताधार्‍यांचे राजकीय हत्यार असल्याचे मत तेव्हा मोदी-शहांचे होते. हेच मत सुशांतसिंह राजपूत प्रकरणात व्यक्त झाले तर काय चुकले?’ असा सवाल करत त्यांनी भाजपला टोला लगावला आहे. ’सुशांतच्या मृत्यूआधी दिनो मोरिया या अभिनेत्याच्या घरी एक पार्टी झाली. या पार्टीभोवती रहस्य निर्माण करून त्याचा संबंध सुशांतच्या मृत्यूशी जोडला गेला. दिनो मोरिया व इतर सिनेनट हे राज्याचे मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मित्रपरिवारातले आहेत. त्यामुळेच आरोपांच्या फैरी मुख्यमंत्री ठाकरे व आदित्य ठाकरेंवर झडत असतील तर ते चूक ठरेल. पुराव्याशिवाय बोलणे व आरोप करणे हे नैतिकतेस धरून नाही. पुरावे आहेत काय? हा पहिला प्रश्न. स्वतः आदित्य ठाकरे यांनी त्याबाबत खुलासा केला. तरीही शंका असतील तर त्यासाठी काही वृत्तवाहिन्यांना हाताशी पकडून बदनामी मोहीम राबवणे हा मार्ग आहे काय? असा थेट सवाल भाजपला केला आहे. त्याशिवाय ’सुशांतसिंह राजपूत प्रकरणात बिहार सरकारला तसे पडायचे कारण नव्हते. सुशांतचे कुटुंब म्हणजे वडील पाटण्यात राहतात. त्याच्या वडिलांशी त्याचे संबंध चांगले नव्हते. वडिलांनी केलेले दुसरे लग्न सुशांतला मान्य नव्हते. त्यामुळे वडिलांशी त्याचे भावनिक नाते उरले नव्हते. याच वडिलांना फूस लावून बिहारमध्ये एक ‘एफआयआर’ दाखल करायला लावला गेला व मुंबईत घडलेल्या गुन्ह्याचा तपास करायला बिहारचे पोलीस मुंबईला आले. याचे समर्थन होऊच शकत नाही. बिहारचे पोलीस म्हणजे ‘इंटरपोल’ नव्हे, असेही त्यांनी म्हटले आहे.