धक्कादायक ! वाळूमाफियांकडून तहसीलदारावर गाडी घालून जिवे मारण्याचा प्रयत्न

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – वाळूचोरी करणाऱ्या लोकांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महिला तहसीलदारांच्या अंगावर पिकअप वाहन घालून त्यांना जखमी करून जिवे मारण्याचा प्रयत्न (sand-mafia-tries-to-kill-woman-tehsildar-in-tasgaon-sangli) केला. सांगली जिल्ह्यातील तासगावमधील कपूर ओढ्यात शनिवारी (ता. 21) दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.

अनिकेत अनिल पाटील (रा. पुणदी रोड, तासगाव) व अन्य एक जण अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी तहसीलदार कल्पना दत्तात्रय ढवळे (वय 44, रा. तासगाव) यांनी तासगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

तासगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तासगाव शहरापासून जवळच असलेल्या कपूर ओढ्यात अवैध वाळूउपसा आणि वाहतूक सुरू असल्याची माहिती शनिवारी तहसीलदार ढवळे यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी दुपारी एकच्या सुमारास कर्मचाऱ्यांसह कपूर ओढ्यावर कारवाईसाठी पोहाेचल्या होत्या. त्यावेळी एका पिकअप वाहनात अवैधरित्या वाळू भरण्याचे काम सुरू होते.

तहसीलदार ढवळे यांनी उपस्थितांना काम थांबवण्याची सूचना केली. तसेच वाहन जप्तीची कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी अनिकेत पाटील आणि त्याच्या सहकाऱ्याने तहसीलदारांच्या कारवाईला विरोध केला. तसेच वाळूने भरलेले पिकअप वाहन बेदरकारपणे चालवत तहसीलदारांच्या दिशेने आणले. अंगावर वाहन घालून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, वेळीच बाजूला झाल्याने तहसीलदार बचावल्या. स्वतःचा बचाव करताना जमिनीवर पडल्याने त्या किरकोळ जखमी झाल्या. गुन्ह्यातील दोन्ही आरोपींचा शोध सुरू असून, वाहन जप्त करण्याची कारवाई लवकरच केली जाईल, अशी माहिती तासगाव पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, तासगाव, आटपाडी, कवठेमहांकाळ परिसरात वाळू तस्करीचे प्रमाण वाढले असून, त्यांना रोखण्याचे आव्हान पोलीस आणि महसूल यंत्रणेसमोर निर्माण झाले आहे.