वाळू माफियांचा पोलिसांवर हल्ला, तिघांवर गुन्हे दाखल; शिक्रापुर पोलिस स्टेशन हद्दीतील घटना

शिक्रापूर : शिरुर तालुक्याच्या शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीतील धामारी गावच्या हद्दीमध्ये संशयित ट्रकला पोलिसांनी थांबविले असताना एका कार मधून आलेल्या दोघांनी कारवाई करणाऱ्या पोलिसांवर हल्ला करत पोलिसांना धक्काबुक्की केल्याची घटना घडली आहे. याबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे खंडू बबन रासकर, रामभाऊ कोंडीभाऊ पवार व विजय गव्हाणे या तिघांवर पोलिसांवर हल्ला करत सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिक्रापूर ता. शिरूर पोलीस स्टेशन हद्दीतील कान्हूर मेसाई गावच्या परिसरात सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंके, पोलीस नाईक प्रताप कांबळे, पोलीस शिपाई विशाल देशमुख, राकेश मळेकर, होमगार्ड मनोहर पुंडे, साहिल तांबोळी हे २८ मार्च रोजी रात्रीच्या सुमारास रात्रगस्त घालत असताना त्यांना एम एच १२ एस एफ २१६६ हा एक संशयित ट्रक आल्याचे दिसले यावेळी पोलिसांनी त्यांना थांबण्याची विनंती केली असता त्या ट्रकचालकाने सदर ट्रक भरधाव वेगाने धामारी बाजूकडे पळविला यावेळी पोलीस पाठलाग करत असताना त्या ठिकाणी पाठीमागून एम एच १२ एस यु ३४५५ हि कार आली त्या कारचालकाने पोलिसांच्या वाहनाच्या पुढे त्याची कार घेऊन पोलीस करत असलेल्या पाठलाग मध्ये अडथळा निर्माण केला, दरम्यान पोलिसांनी पुढे धामारी गावातील लोकांना फोन करून वाहनांची माहिती देत वाहने अडविण्यास सांगितले असता, धामारी गावातील इसमांनी ट्रक अडविला असता ट्रक चालक ट्रक सोडून पळून गेला यावेळी ट्रकच्या पाठीमागील कारचालक त्या ठिकाणहून देखील पळून जात असताना गावातील लोकांनी कारवर दगडफेक करत कार अडवली यावेळी कार मधील चालक पळून जात असताना पोलीस नाईक प्रताप कांबळे यांनी त्याला पकडले असता त्याने कांबळे यांना धक्काबुक्की केली, यावेळी कार मधील दुसरा इसम पळून गेला असता पोलीस शिपाई विशाल देशमुख, राकेश मळेकर, होमगार्ड मनोहर पुंडे, साहिल तांबोळी यांनी त्याला पाठलाग करून पकडले असता त्याने पोलिसांवर हल्ला करत धक्काबुक्की केली यावेळी गावातील लोकांच्या मदतीने दोन्ही इसमांना ताब्यात घेण्यात आले, यावेळी ट्रकची पाहणी केली असता ट्रकमध्ये चोरून वाळू आणली असल्याचे समोर आले, तर पळून गेलेल्या इसमाचे नाव विजय गव्हाणे असल्याचे समजले, यावेळी पोलिसांनी सदर ट्रक तसेच कार जप्त करत दोघांना ताब्यात घेतले, याबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक प्रताप नारायण कांबळे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी खंडू बबन रासकर वय ३५ वर्षे, रामभाऊ कोंडीभाऊ पवार वय ३४ वर्षे, विजय गव्हाणे तिघे रा. अन्नापूर ता. शिरूर जि. पुणे यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंके हे करत आहे.

रामभाऊ पवार यांच्यावर अनेक गंभीर गुन्हे ………

शिक्रापूर पोलिसांवर हल्ला करत सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी गुन्हे दाखल करत अटक केलेल्या रामभाऊ कोंडीभाऊ पवार या इसमावर यापूर्वी देखील सरकारी कामात अडथळा, चोरी यांसह आदी गंभीर गुन्हे दाखल आहेत, तर सदर आरोपीवर तडीपारच्या कारवाई साठी प्रस्ताव सादर करणार असल्याचे शिक्रापूर पोलिसांनी सांगितले आहे.