वाळू माफियांचा भ्याड हल्ला ; तहसिलदार आणि पथकाच्या अंगावर ट्रॅक्टर चढवण्याचा प्रयत्न

जिल्ह्यातील सर्व तलाठी व मंडल अधिकाऱ्यांचे लेखणी बंद आंदोलन

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरात पांझरा नदी पात्रात अवैधरित्या वाळु उपसा सुरुच आहे. पांझरा नदी पात्रात वाळु उपसा सुरु आहे अशी माहिती मिळताच आज रविवारी नकाणे वार (जि. धुळे) या गावालगत अवैध वाळू उपसा करणाऱ्या चोरट्यांना पकडण्यासाठी तहसीलदार धुळे ग्रामीण व त्यांचे पथक कारवाईसाठी गेले होते. त्यावेळी वाळू चोरट्यांनी थेट पथकाच्या अंगावर ट्रॅक्टर चढवण्याचा प्रयत्न केला. काही वेळातच गावातील मद्यधुंद अवस्थेत असलेले गावगुंड बोलावत व काही महिलांना सोबत घेऊन तहसीलदार धुळे ग्रामीण व त्यांचे पथकासोबत धुडगुस घालत, शिवीगाळ करत, दमदाटी व मारहाण करण्याचा प्रकार झाला असून हा एक भ्याड हल्ला केलेला आहे.

याचा धुळे जिल्ह्यातील तलाठी संघटना तीव्र निषेध करत असून या गावगुंड वाळू चोरट्यांना त्यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यानुसार अटक करून कडक कायदेशीर कारवाई होत नाही तोपर्यंत लेखणी बंद आंदोलन करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. पूर्ण धुळे जिल्ह्यात तलाठी व मंडल अधिकारी यांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे.

जिल्हाधिकारी यांना लेखी निवेदन सोमवारी सकाळी दहा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात येणार आहे. भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यात येणार आहे, असा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

Visit : Policenama.com