वाळूमाफियांची हिम्मत वाढली, पोलीस उपनिरीक्षकाला तुकडे करण्याची धमकी

बीड : पोलीसनामा ऑनलाईन – अवैध वाळू वाहतुक करणार टेम्पो अडविल्यावर चालकाने चक्क टेम्पोतील हत्यार बाहेर काढून पोलीस उपनिरीक्षकालाच तुकडे करण्याची धमकी दिल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. एवढेच नाही तर वर्दीवरील पोलीस उपनिरीक्षकाची कॉलर पकडून हिसका देत टेम्पो घेऊन पलायन केले. त्यानतंर पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत. हा प्रकार शिरूर तालुक्यातील दहिवंडी रोडवरील उत्तमनगर येथे मंगळवारी पहाटेच्या सुमारास घडला.

देवीदास गहिणीनाथ जायभाये (वय ३४, रा. पिंपळनेर, ता. शिरूर, जि. बीड) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याच्याविरोधात शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिरूर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक मनोज बरुदे हे समन्स वारन्ट बजावण्यासाठी आपल्या पथकासह जात होते. त्यावेळी समोरून एक टेम्पो (एमएच २३ एफएल १८९६) मधून अवैध वाळू वाहतुक केली जात असल्याचे त्यांना दिसले. त्यांनी हात दाखवून टेम्पो अडवला. त्यावेळी चालक देवीदास जायभाये हातात धारदार कत्ती घेऊन खाली उतरला. आणि तू बाजूला सरक नाही तर तुझे तुकडे करतो. अशी धमकी दिली. त्यानंतर त्याने बरुदे यांच्या वर्दीचे गचुरे पकडून हिसका देऊन टेम्पो घेऊन पळून गेला. त्याच्या हातात हत्यार असल्याने पोलिसांनी अडविले नाही. त्यानंतर पोलीस ठाण्यात माहिती देण्यात आली. पुढे रस्त्यावर नाकाबंदी करून जायभायेला अटक करण्यात आली. तसेच टेम्पो ठाण्यात नेण्यात आला.

Loading...
You might also like