प्रेरणादायी ! केंद्रीय राखीव पोलिस दलातील 39 वर्षीय जवानानं मृत्यूला कवटाळताना दिलं तिघांना जीवनदान, समाजापुढं एक नवा आदर्श आव्हाड

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन –  केंद्रीय राखीव पोलिस दलात कर्तव्यावर असलेल्या संदीप रामदास महाजन या ३९ वर्षीय जवानाचा रात्री मृत्यू झाला. मृत्यूनंतर त्यांनी अवयवदानातुन तिघांना जीवनदान देऊन त्यांनी समाजापुढे एक नवा आदर्श ठेवला आहे. विशेष म्हणजे, संदीप हा जळगाव येथील निपाणी गावातील एका शेतकऱ्याचा मुलगा आहे.

संदीप यांच्या यकृत दानातून ६० वर्षीय व्यक्तीचा, एका किडनी दानातून ५२ वर्षीय व्यक्ती तर दुसरी किडनी वर्धेतील एका ३५ वर्षीय व्यक्तीला देऊन त्यांचा जीव वाचवला आहे. संदीपच्या अवयवदानाला न्यू इरा हॉस्पिटलमधील डॉक्टरांकडून सलाम करण्यात आला. संदीपचे पिता रामदास यांनी लेकराने मरतानाही तिघांना जीवन दान दिले ही प्रतिक्रिया देताना त्यांना आपले अश्रू अनावर झाले.

संदीप महाजन यांना मेंदूचा आजार झाला होता. त्यामुळे त्यांना मागील ६ दिवसांपूर्वी न्यू इरा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. २४ फेब्रुवारीला संदीपच्या मेंदूपेशी मृत झाल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. या दरम्यान डॉ. अश्विनी यांनी केलेल्या समुपदेशनातून संदीपची पत्नी मोनाली महाजन यांचे समुपदेशन केले. त्यानंतर पतीच्या अवयवदानाचा निर्णय होताच विभागीय अवयवदान समितीच्या अध्यक्ष डॉ. विभावरी दाणी आणि सचिव डॉ. संजय कोलते यांच्यासह वीणा वाठोरे यांनी अवयवाच्या प्रतिक्षेत असणाऱ्यांची यादी चेक केली. ६० वर्षीय व्यक्ती यकृताच्या प्रतिक्षेत असल्याचे कळले. त्यानंतर त्यांना संपर्क साधण्यात आला. न्यू इरा हॉस्पिटलचे संचालक डॉ. आनंद संचेती, डॉ. निधिश मिश्रा यांच्या नेतृत्वात डॉ. राहुल सक्सेना डॉ. स्नेहा खाडे, डॉ. अश्विनी चौधरी यांनी यकृत तर किडनी प्रत्यारोपणासाठी दुसऱ्या ठिकाणी डॉ. संजय कोलते यांच्या पथकाने प्रत्यारोपण केले. डोळे माधव नेत्रपेढीला दान करण्यात आले.

पोलिस वाहतूक विभागाचे उपायुक्त सारंग आव्हाड यांच्या सहकार्याने नागपुरातील न्यू इरा हॉस्पिटलपासून ते वर्धा येथील आचार्य विनोबा भावे रूरल हॉस्पिटलपर्यंत एक ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आला होता. रुग्णवाहिकेने ८८ किलोमीटरचे अंतर अवघ्या ५५ मिनिटांत पार केले. त्यानंतर किडनीच्या प्रतीक्षेत असलेल्या ३५ वर्षीय युवकाला किडनी दान करण्यात आली. यासाठी पोलिस दलातील दत्तात्रेय लांडगे, पोलिस निरीक्षक हेमंत उरलाग्लोंडावार, पोलिस निरिक्षक संदीप भोसले, पोलिस निरीक्षक मनोहर कोटनाके, पोलिस निरिक्षक संजय जाधव, पोलिस निरीक्षक राजेंद्र पाठक, सह आयुक्त अजय मालविय, एपीआय शिंदे, पोलिस उपनिरीक्षक घनश्याम तिवारी, एपीआय किशोर सातवकर यांच्यासह ९० पोलिसांचा ताफा या रस्त्यावर तैनात केला होता.

न्यू इरा हॉस्पिटलमध्ये ३६ यकृत प्रत्यारोपण

गेल्या अडीच वर्षांत नागपुरात ४२ यकृत प्रत्यारोपण करण्यात आले. यापैकी ३६ प्रत्यारोपण न्यू ईरा हॉस्पिटलमध्येच करण्यात आले. तसेच २५ किडनी प्रत्यारोपण सुद्धा करण्यात आले आहे. असे ह्रदय प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. आनंद संचेती यांच्याकडून सांगण्यात आले आहे.