दूध आंदोलन चिघळलं, ‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी दुधाचा टँकर फोडला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – दूध दरवाढीच्या मागणीवरून राज्यतील विविध संघटना आक्रमक झाल्या आहेत. या संघटनांकडून दूध रस्त्यावर ओतून आंदोलन केले जात आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील नांदणी गावातल्या सागर शंभूशेट्टी यांनी आणि त्यांच्या शेजारच्या शेतकऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रतिमेला तसेच ग्रामदैवत काळभैरवला दुधाचा अभिषेक घालून आंदोलन केले.

तर दुसरीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून करण्यात येत असलेलं आंदोलन चिघळलं आहे. पहाटे पुणे बेंगळुरू महामार्गावर दुधाचा टँकर फोडल्यानंतर पुन्हा कसबे डिग्रजहून मुंबईकडे चाललेला राजारामबापू दूध संघाचा टँकर स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी फोडला आहे. दुधाला योग्य भाव मिळावा यासाठी हे आंदोलन आजपासून सुरु झाले आहे. विशेष म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात आंदोलन अधिक तिव्र झाल्याचे पहायला मिळत आहे.

राज्यभरात संघटनांचे आंदोलन
शेतकऱ्यांच्या दूधाला अनुदान द्यावे या मागणीसाठी बीड जिल्हा शिवसंग्रामच्या वतीने जिल्हाधिकारी यांना दुधाच्या पिशव्या भेट देत अनोखे आंदोलन केले. तर पंढरपूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला दुग्ध अभिषेक घालून स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दूध दरवाढीसाठी आंदोलन केले. दुसरीकडे उस्मानाबाद स्वाभिमानी संघटनेकडून तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिरासमोर दूधदरवाढीची मागणी करण्यात आली. मंदिरासमोरच देवीचा अभिषेक करून पूजा करण्यात आली.