सांगली : अखेर ‘त्या’ कुटुंबाला मिळाला ४० वर्षांनी न्याय

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन

गेल्या चाळीस वर्षांपासून वाळीत टाकलेल्या जतमधील मारूती कोळी या मरीआई समाजातील कुटूंबाला अखेर न्याय मिळाला आहे. अंधश्रद्धा निर्मुलन समिती आणि भटक्‍या विमुक्त समाज संघटनेच्या प्रयत्नाला हे यश मिळाले आहे. जत पोलिसांनी जातपंचाना बोलावून घेत सामाजिक बहिष्कार विरोधी कायद्याचा बडगा दाखवला. त्यावेळी पंचांनी एक पाऊल मागे घेत, कोळी कुटुंबियांना समाजात सामावून घेण्याचा निर्णय घेतला.
[amazon_link asins=’B07D9G1GHB,B07417987C’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’7b618634-b76c-11e8-bc33-9d01dc62ca8c’]

याबाबत अधिक माहिती अशी की, मारूती कोळींच्या लग्न समारंभावेळी पंचाचे ऐकले नसल्याने त्यांना लाखाचा दंड केला. त्यानंतर दोन लाखांचा दंड केला. कोळी कुटूंबिय एवढी मोठी रक्कम भरण्यास तयार नव्हते. त्यामुळे त्यांना समाजातून बहिष्कृत केले. त्यांच्या मुलींच्या लग्न कार्यावेळीही पंचाकडून अडवणूक केली जात होती. दरम्यान, कोळी यांनी या अन्यायाविरोधात अंनिस आणि भटक्‍या विमुक्त हक्क परिषदेकडे धाव घेतली. त्याच्या माध्यमातून जिल्हा पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांच्याकडे लेखी तक्रारही देण्यात आली.

दरम्यान, अधीक्षक शर्मा यांनी संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश जत पोलिसांना दिले. त्यानुसार निरीक्षक राजू तासिलदार यांनी जातपंचाना ठाण्यात बोलावून घेतले. सामाजिक बहिष्कार कायद्याची माहिती देत चांगलेच सुनावले. त्यानंतर पंचानी कोळी कुटूंबियांना समाजात घेण्याचा निर्णय घेतला. दोन्ही मुलींची लग्ने समाजाच्या रितीरिवाजाप्रमाणे पार पाडू, असे आश्‍वासनही दिले. त्याचबरोबर त्यांच्या कुटुबांस समाजाच्या सर्व धार्मिक कार्यक्रमात योग्य तो मान दिला जाईल, असे लेखी दिले. भटक्‍या विमुक्त हक्क परिषदेचे विकास मोरे, गणेश निकम, नितीन मोरे, अतुल कांबळे, दयानंद मोरे, विजय वीर, अंनिसचे राज्य सरचिटणीस संजय बनसोडे, कार्यवाह राहुल थोरात यांनी यासाठी पाठपुरावा केला.

पोलीसनामा ऑनलाईन : महत्वाच्या बातम्या एका क्लिकवर एकाच ठिकाणी