सांगली : हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या राष्ट्रवादीच्या नेत्याचा मृत्यू

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वीय सहाय्यक गजानन पाटील यांच्या भावावर दोन अज्ञातांनी खुनी हल्ला केला. दुचाकीवरून आलेले दोघे आनंदराव पाटील यांच्यावर हल्ला करून पसार झाले. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या आनंदराव पाटील यांना सांगली येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या खूनामुळे सांगली जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

आनंदराव पाटील हे राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक कार्यकर्ते असून ते खटाव-भिलवडी रस्त्यावर असलेल्या आपल्या शेतातून परतत असताना त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आला होता. हल्लेखोरांनी आनंदराव पाटील यांच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार केल्याने या घटनेत ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. या हल्ल्याने खळबळ उडाली असून हल्ला करणारे कोण होते हे अद्याप समजू शकले नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

आनंदराव पाटील हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वीय सहाय्यक गजानन पाटील यांचे बंधू होते. हल्ल्यानंतर आरोपी दुचाकीवरून पळून गेले. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत. घटनास्थळी डॉग स्कॉडला पाचारण करण्यात आले. त्याने दाखवलेल्या मार्गावरून पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. हल्ल्याचे नेमके कारण समजू शकले नाही. आनंदराव पाटील हे राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक कार्यकर्ते असून ते 15 वर्षे सरपंचही होते.