सांगलीत भरदिवसा घरफोडी करणाऱ्यास अटक

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – मिरज तालुक्यातील कुपवाड शहरात दिवसा घरफोडी करणाऱ्या टोळीला अटक करण्यात आले. सागर शहाजी जावीर (वय 19, आहिल्यानगर, कुपवाड) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याच्याकडून सुमारे दीड लाख रूपयांचे चार तोळ्याचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ही कारवाई केली.

सांगली, कुपवाड शहर आणि परिसरात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. ते रोखण्याचे आदेश पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी एलसीबीला दिले आहे. एलसीबीचे निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली खास पथक तयार करण्यात आले आहे. पथक सांगलीतील सराफ कट्टा परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी एकजण चोरीचे सोने विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पथकास मिळाली. पथकाने सापळा रचून सागर जावीर याला ताब्यात घेतले. सखोल चौकशी केल्यानंतर त्याच्याकडे 39 ग्रॅम 800 मिली सोन्याचे दागिने मिळून आले.

त्याने कुपवाड येथील रोहिदास समाज मंदिर परिसरातील एका घरात दिवसा घरफोडी केल्याची कबुली दिली. त्यानुसार त्याच्यावर कुपवाड औद्योगिक पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. त्याच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्‍यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

निरीक्षक पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रवीण शिंदे, अमित परीट, बिरोबा नरळे, जितेंद्र जाधव, शशिकांत जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/