धनगर समाजाचे नेतृत्व सांगलीकरांकडे ?

बारामती :  पोलीसनामा ऑनलाईन – महाराष्ट्रात राज्यपातळीवर धनगर समाजाचे नेतृत्व बऱ्याचवेळा बारामतीतून केले गेले. अवघ्या चार वर्षापूर्वी धनगर समाजाच्या आरक्षणासाठी तब्बल पंधरा दिवसाचे सर्वात मोठे आंदोलन याच बारामती तालुक्यात केले गेले त्याचे परिणाम राज्यातही झाले . मात्र गेल्या वर्षभरापासून धनगर समाजाच्या नेतृत्वाचा केंद्रबिंदू सांगलीकडे सरकला आहे. आटपाडीचे तरुण नेतृत्व गोपिचंद पडळकर व उत्तमराव जानकर यांनी औरंगाबाद, आरेवाडी असे चार मेळावे घेऊन मोठ्या प्रमाणात समाजाचा पाठींबा मिळवला असून  समाजानेही पडळकर यांचे नेतृत्व मान्य  करीत भरघोस  पाठिंबा दिला. परंतु ही राजकीय चाल आहे की काय अशी संशयास्पद परिस्थिती निर्माण झाली आहे. थोडक्यात बारामतीतून नेतृत्व बाहेर जावे यासाठी पध्दतशीरपणे प्रयत्न केले गेल्याची चर्चाही सध्या चालू  आहे.

नेतृत्व बदलाची करणे –

बारामती तालुक्यात देवकाते व कोकरे यांचे नेतृत्व मान्य केले गेले होते.  मात्र सातत्याने बारामतीकरांच्या कुशीत राहूनच सत्ता भोगायची व समाजाकडे दुर्लक्ष करायचे अशी परिस्थिती गेल्या तीन वर्षापासून निर्माण झाल्याने राज्यातील धनगर समाजाने बारामतीतील नेतृत्वावरच शंका घेण्यास सुरुवात केली. व त्यात काही प्रमाणात तथ्यही असल्याने धनगर समाज नवनेतृत्वाच्या शोधात होता. अशा परिस्थितीत ही पोकळी भरुन काढण्याचे काम गोपिचंद पडळकर, उत्तम जानकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी गेल्या तीन वर्षात केले आहे. व यास मोठ्या  प्रमाणात यशही मिळत आहे. अशाही परिस्थितीत बारामतीतील धनगर समाजातील युवकांमध्ये यामुळे चलबिचल न झाल्यास नवलच म्हणावे लागेल.  याचे महत्त्वाचे कारण म्हणजे राज्याच्या राजकारणात धनगर समाजाला बारामतीकरांनी डावलल्याचे शल्य धनगर समाजात खोलवर रुतलेले आहे. त्यातच परिणाम आरेवाडीच्या नुकत्याच झालेल्या धनगर बांधवांच्या समाज मेळाव्यात दिसून आला  आहे.

या परिस्थितीत बारामतीकर धनगर समाजाचे पदाधिकारी आपली कोणती भूमिका मांडणार आहेत की हाराकिरीच पत्करणार आहेत. याबाबत समाजात चांगलीच चर्चा सुरु आहे.  मात्र या चर्चेकरीता कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याचे एकीकडे दिसून येत आहे. तर दुसरीकडे वैचारिक मंथन व्हावे, समाज संघटनेत वैचारीक पातळीवर चर्चा व्हावी त्या अनुषंगाने समाज बांधवांपुढे या चर्चेची मांडणी व्हावी,  संघटनेच्या दृष्टीने याबाबत सर्व गटतट विसरुन एकोपा निर्माण व्हावा व चर्चा व्हावी किमान काही पातळीवर मतैक्य व्हावे याबाबत राज्यपातळीवर केवळ चर्चाच होताना दिसून येत आहे. याकडेही पडळकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी वेळीच लक्ष द्यावे अन्यथा लोकसभेच्या व विधान सभेच्या येणाऱ्या निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर सर्वच गटतट आपापले शक्तिप्रदर्शन करण्यात मश्गुल होतील आणि मुख्य म्हणजे यात समाजाचे फार मोठे नुकसान होईल अशीही चर्चा सुरु आहे.

या घटनांचे पडसाद यापुढील काळात सतत उमटत राहणार आहेत. केवळ राजकीय स्वार्थापोटी समाजाचे नेते आमचा उपयोग करणार की काय ? मग आमच्या हातात नेमके काय पडणार ? निवडणूका संपल्यानंतर सर्वच पक्ष दुर्लक्ष करतात हीच परिस्थिती यावेळी ओढावणार का ? असे असंख्य  प्रश्न धनगर समाजातील युवकांमध्ये चर्चीले जात आहेत. त्यामुळेच बारामतीकडील नेतृत्वाचा केंद्रबिंदू हा राज्यपातळीवर सांगलीकडे सरकला असल्याचे बोलले जात आहे. अनुभवी नेते अण्णा डांगे, सांगोल्याचे आमदार व जेष्ठ नेते गणपतराव देशमुख, पुणे जिल्हापरिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते, खासदार डॉ. विकास महात्मे, यांनी या  विषयावर चिंतन करुन समाजापुढे नेमक्या सद्य परिस्थितीचे मांडणी करण्याची गरज असताना यावर भाष्य  केले जात नाही. हाही महत्त्वाचा मुद्दा या निमित्ताने चर्चिला  जात आहे. त्यामुळे येणारा काळ हा महत्त्वाचा ठरणार आहे.