संगमनेर : शपथविधीसाठी हेलिकॉप्टरमधून आले नूतन सरपंच

संगमनेर : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणूका नुकत्याच पार पडल्या असून सध्या सरपंच, उपसरपंच पदाच्या निवडी सुरु आहेत. नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील आंबी दुमाला गावातही या निवडी झाल्या. विशेष म्हणजे यागावात सरपंच पदाचा शपथविधीही झाला. या शपथविधीला नूतन सरपंच जालिंदर गागरे चक्क हेलिकॉप्टरमधून गावात आले होते. त्यामुळे पंतप्रधान, राज्याचे मुख्यमंत्री यांना लाजवेल असा शपथविधी सोहळा पार पडल्याने सध्या या शपथविधीची चर्चा सर्वत्र सुरु आहे.

जालिंदर गागरे यांच्या पुण्यामध्ये अनेक कंपन्या आहेत. ते पुण्यात वास्तव्यास असतानाही त्यांनी कधी आपल्या गावशी संपर्क तोडला नाही. त्यामुळे त्यांची गावाशी नाळ कायमच घट्ट जोडलेली. त्यामुळे त्यांनी आंबी दुमाला गावच्या ग्रामपंचायतीची निवडणूक लढवली आणि त्यांचा संपूर्ण पॅनलच विजयी झाले. योग योग म्हणजे सरपंचपद सर्वसाधारण गटासाठी निघाले असल्यामुळे तेच गावचे सरपंच झाले. त्यानंतर शपथविधीचा कार्यक्रम ठरला त्यानुसार शपथविधीसाठी त्यांनी दुपारी हेलिकॉप्टरने गावात प्रवेश केला. गावातील सर्व महिलां व पुरुषांनी फेटे बांधून, तसेच अबाल वृद्धांनी लेझीम खेळत ढोल ताशांच्या गजरात सरपंच जालिंदर गागरे यांचे स्वागत केले. त्यानंतर बारा बैलांच्या बैलगाडीतून त्यांची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली.

याप्रसंगी बोलताना नूतन सरपंच जालिंदर गागरे म्हणाले, महात्मा गांधी यांनी खेड्याकडे चला, असे आवाहन केले होते. त्यापासून प्रेरणा घेऊन मी गावात लक्ष घालून विकास करण्याचा निर्णय घेतला आहे. हा सोहळा कायमचा लक्षात राहावा त्यासाठी हेलिकॉप्टरने आलो असे त्यांनी सांगितले.