एसटी बसने ट्रॅक्टरला धडक दिल्याने शालेय विद्यार्थी जखमी, जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर अपघात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पालीहून संगमनेरकडे जाणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांच्या एस टी बसने ऊसाच्या ट्रॅक्टरला पाठीमागून धडक दिली. त्यात बसमधील किमान २४ विद्यार्थी जखमी झाले आहेत. त्यात ३ शिक्षकांचा समावेश आहे. हा अपघात जुन्या मुंबई पुणे महामार्गावर सोमाटणे खिंडीत पहाटे सव्वाचार वाजण्याच्या सुमारास घडला.

याबाबत तळेगाव पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, संगमनेर येथील बी एस खताळ जनता विद्यालयाचे हे विद्यार्थी आहेत. विद्यार्थ्यांची सहल घेऊन शिक्षक पाली येथे गेले होते. तेथून ते परत संगमनेरकडे जात होते. यावेळी सोमाटणे खिंड येथे जुन्या पुणे मुंबई महामार्गावर एक ऊसाचा ट्रॅक्टर थांबला होता. एस टी चालकाला हा ट्रॅक्टर सुरुवातीला काही दिसला नाही. बस अगदी ट्रॅक्टरच्या जवळ गेली. तेव्हा चालकाला हा ट्रॅक्टर दिसला.

त्याने धडक चुकविण्याचा शेवटच्या क्षणी प्रयत्न केला. परंतु, ट्रॅक्टरला धडक बसली. बस मध्ये ४४ मुले व ३ शिक्षक होते़ बसमधील सर्व जण झोपलेले होते. त्यामुळे अचानक झालेल्या या धडकेमुळे २४ मुले व ३ शिक्षक जखमी झाले. जखमींपैकी पवना हॉस्पिटलमध्ये १२ मुलांवर उपचार करण्यात येत आहे. अन्य १२ जणांवर उपचार करुन त्यांना हॉस्पिटलमधून सोडण्यात आले आहे. तळेगाव दाभाडे पोलीस अधिक तपास करीत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/