Coronavirus Impact : सांगलीत होणारं 100 वं मराठी नाट्य संमेलन पुढं ढकललं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – यंदाचे १०० वे मराठी नाट्य संमेलन हे सांगलीत आयोजित करण्यात येणार होते. त्यामुळे नाट्यरसिकांचे या सम्मेलनाकडे लक्ष लागून आहे. परंतु देशभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. अनेक शाळा कॉलेजेस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला जात आहे तर चित्रपटगृह देखील बंद ठेवण्याचा निर्णय घेतला जात आहे. आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सांगलीत होणाऱ्या नाट्यसंमेलनास देखील पुढे ढकलण्यात आले आहे असे वृत्त समोर येत आहे.

दरम्यान अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी देखील स्पष्ट केले होते की, नाट्य परिषदेचे धोरण ठरविताना कोरोनाच्या स्थितीचा नक्कीच विचार केला जाईल. त्यामुळे कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. सांगलीमध्ये हे नाट्य संमेलन जागतिक रंगभूमी दिनाच्या दिवशी म्हणजेच २७ मार्चला घेण्यात येणार होते.

यंदाचे संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल यांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. विशेष म्हणजे नाट्यसंमेलनाच्या शतकमहोत्सवी वर्षात डॉ. जब्बार पटेल यांच्यासारख्या कसलेल्या अभिनेता, दिग्दर्शकाची निवड झाल्याने नाट्यवर्तुळातून देखील समाधान व्यक्त केले जात होते.