सांगली : रुग्णाला साडेबारा लाखांची नुकसान भरपाई देण्याचे ग्राहक न्यायालयाचे आदेश

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन

फटाक्यांच्या स्फोटात जखमी झालेल्या रुग्णावर चुकीची शस्त्रक्रिया करण्यात आल्याने रुग्णाला कायमचे अपंगत्व आले आहे. त्यामुळे डॉक्टरांनी रुग्णाला १२ लाख ३२ हजार रुपयांची नुकसान भरपाई व त्यावरील व्याज देण्याचे आदेश ग्राहक न्यायालयाने दिले आहेत. व्याजाची रक्कम ३० दिवसांत देण्यात यावी असे देखील आदेशात म्हटले आहे. हे आदेश अनिल खडसे यांच्या अध्यक्षतेखाली श्रीकांत कुंभार व सुरेखा हजारे यांच्या ग्राहक न्यायालयाने दिले आहेत.

अनिल चंद्रपट्टण (वंटमोरे कॉर्नर, मिरज) असे त्या डॉक्टरांचे नाव आहे. अनिलकुमार बाळासाहेब खाडे (वय ४२, रा. कवठेएकंद) हे दि. २८ फेब्रुवारी २००८ रोजी  फटाक्यांच्या स्फोटामध्ये जखमी झाले होते. त्यांच्या उजव्या हाताला दुखापत होऊन बोटे जळाली होती. त्यांना डॉ. चंद्रपट्टण यांच्या दवाखान्यात दाखल केले होते.त्याच दिवशी रात्री ११ वाजता  त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. ती करण्यापूर्वी  कोणतीही कल्पना अनिलकुमार किंवा त्यांच्या नातेवाईकांना देण्यात आली नाही. दुसर्‍या दिवशी त्यांना जाग आल्यावर त्यांच्या लक्षात आले की त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली आहे.

डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून त्यांचे पोट डाव्या बाजूने फाडून दोन कातड्याच्या कप्प्यामध्ये त्यांच्या उजव्या हाताची बोटे झाकून ठेवली होती. सुमारे एक महिना  उजव्या हाताची बोटे पोटाच्या डाव्या बाजूच्या कप्प्यात तशीच ठेवण्यात आली होती. त्यानंतर अनिलकुमार यांना त्रास होऊ लागल्याने त्यांनी  तिथून डिस्चार्ज घेतला व जयसिंगपूर येथील एका रुग्णालयात उपचार घेतले. दरम्यानच्या काळात पोटात व  उजव्या हाताच्या जखमेमध्ये इन्फेक्शन झाले होते. त्यामुळे जयसिंगपूर येथील डॉक्टरांना त्यांच्या हाताची बोटे कापून काढावी लागली होती.

डॉ.  चंद्रपट्टण यांच्या हलगर्जीपणाबद्दल अनिलकुमार यांनी पोलिसांत फिर्याद दिली, तसेच ग्राहक न्यायालयातही तक्रार दिली होती. ग्राहक न्यायालयाने आज निर्णय दिला.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a417617c-bc19-11e8-8fc2-dd8b4c489869′]