धक्कादायक ! वाळू माफियांनी थेट मंडल अधिकारी अन् तलाठयाच्या अंगावर ट्रॅक्टर घातला

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन –  वाळूची चोरी रोखण्यासाठी गेलेल्या मंडल अधिकारी आणि तलाठ्याच्या अंगावर ट्रॅक्टर घालून जीवे मारण्याचा धक्कादायक प्रकार आटपाडी तालुक्यात समोर आला आहे. यामध्ये मंडळ अधिकारी पांडुरंग कोळी आणि खटकाळे गावाचे तलाठी जखमी झाले आहेत. याप्रकरणी आटपाडी पोलिसांनी उदय देखमुख व गंड्या देशमुख (रा. खटकाळे) यांच्यासोबत अज्ञात ट्रॅक्टर चालकावर गुन्हा नोंद केला आहे.

पोलिसांनी सांगितल्यानुसार, तहसीलदारांना खटकाळे येथील माणगंगा नदीवर अवैध वाळूची तस्करी सुरु असल्याची माहिती प्राप्त झाली होती. त्यानुसार त्यांनी मंडल अधिकारी पांडुरंग कोळी यांना माहिती देत कारवाई करण्याची सूचना दिली. त्यानंतर कोळी व खटकाळे येथील तलाठ्यांना सोबत घेऊन कारवाईसाठी गेले. तेव्हा त्यांना नदी पात्राजवळ वाळूने भरलेली ट्रॉली आणि चिखलात अडकलेला ट्रॅक्टर दिसला. अधिकाऱ्यांना पाहताच ट्रॅक्टरचालक ट्रॅक्टर सोडून पळून गेला. परत काही वेळात ट्रॅक्टरमालक घटनास्थळी पोहचला. अधिकाऱ्यांनी त्यास ट्रॅक्टर तहसील कार्यालयात नेण्यास सांगितले.

तथापि, त्याने अधिकाऱ्यांना दमदाटी करत ट्रॅक्टरला आडवे आल्यास याद राखा, असे म्हणत अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न केला. तेव्हा स्वतःचा जीव वाचण्याचा प्रयत्न करताना मंडल अधिकारी आणि तलाठी रस्त्यावर पडल्याने जखमी झाले. नंतर काही वेळात गंड्या देशमुख याने अंगावर दुचाकी घालून अधिकाऱ्यांना मारण्याचा प्रयत्न केला. व ट्रॅक्टर जप्त केल्यास जिवे मारण्याची धमकी दिली.

दरम्यान, मंडल अधिकारी यांनी तात्काळ आटपाडी पोलीस ठाण्यात धाव घेत वाळू तस्करांच्या विरुद्ध फिर्याद दिली. या फिर्यादीवरुन पोलिसांनी उदय देशमुख, गंड्या देशमुख आणि अज्ञात ट्रॅक्टर चालकावर गुन्हा नोंद केला.