सांगलीत २००५ पेक्षा मोठा ‘महापूर’, कराड शहरही बुडाले पाण्यात

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – कृष्णा, कोयना नद्यांना आलेल्या महापूराने सांगलीमध्ये २००५ पेक्षा मोठा महापूर आला असून कराड शहरही पाण्यात बुडाले आहे. कृष्णा नदीला आलेल्या पुरामुळे सांगली शहराला पाण्याचा वेढा पडला असून नदीपात्रापासून बाहेर दीड किलोमीटरपर्यंत पाणी बाहेर येत असून कृष्णा घाटावरील पुल पाण्याखाली गेला आहे. मिरज ते नृरसिंहवाडी मार्ग बंद पडला आहे.

एनडीआरएफची दोन पथके, नौदलाची दोन पथके सांगलीत बचाव कार्यासाठी दाखल झाली आहेत. सांगली शहरातील अनेक बंगल्यांमध्ये पाणी शिरले असून पहिले मजले पूर्णपणे पाण्यात बुडाले आहे.
सांगलीजवळ कृष्णा नदीची पाणी पातळी ५४ फुटाच्या वर गेली आहे. सांगलीतील ही आतापर्यंतची सर्वाधिक पातळी गाठली आहे. २००५ साली सांगलीतील कृष्णा नदीची पाणी पातळी ५३ फुट ९ इंच इतकी होती. कृष्णेने २००५ ची पाणी पातळी ओलांडली आहे. त्यामुळे अर्ध्या सांगलीमध्ये पुराचे पाणी शिरले आहे.

कोयना धरण क्षेत्रात सकाळी आठ वाजेपर्यंत तब्बल २४९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. धरणातून १ लाख २० हजार ३७५ क्युसेक पाणी कोयना नदीत सोडण्यात येत असून वाटेतील सर्व गावांना महापुराचा फटका बसला आहे. महाबळेश्वरला २३२ तर नवजा येथे २६५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे कोयनेच्या पाणी पातळीत वाढ होत आहे.

कराड शहराला कोयनेच्या पाण्याचा मोठा फटका बसला असून पुणे बंगलुरु महामार्गावर वठार येथे तब्बल ५ फुटापर्यंत पाणी वाढले आहे. त्यामुळे कराडहून पुढे कोल्हापूरकडे जाण्याचा मार्ग बंद पडला आहे.
कोल्हापूर व सांगलीतील पूरपरिस्थितीचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला असून त्यांनी कर्नाटकाचे मुख्यमंत्र्यांना फोन करुन अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविण्यास सांगितले आहे. सध्या अलमट्टी धरणातून ४ लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु असल्याने पाणी वेगाने पुढे सरकत आहे.

आरोग्यविषयक वृत्त –