…म्हणून इस्लामपूरमध्ये 3 दिवस दूध, भाजीपालाही मिळणार नाही

पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा विळखा घट्ट होत चालला असताना सांगलीत 24 कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. त्यामुळे प्रशासन सतर्क झाले असून इस्लामपूर शहरातील कोरोनाबाधित कुटुंबियांच्या संपर्कात शहरातील 337 नागरिक आल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. कोरोना विषाणुचा फैलाव रोखण्यासाठी इस्लामपूर शहर आज, रविवार 29 मार्च पासून 31 मार्च अखेर पूर्णतः लॉकडाउन करण्याचा निर्णय नगरपालिका सभागृह झालेल्या बैठकीत सर्वानुमते घेण्यात आला. या कालावधीत फक्त मेडिकल स्टोअर्स एक दिवसाआड सुरू राहणार असून दूध, भाजीपाला, किराणा दुकानंही बंद राहणार आहेत.

इस्लामपूरातील बँका, पतसंस्थांनीही लॉकडाउनमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे. संभाव्य गरज ओळखून इन्स्टिट्यूटशनल क्वारंटाईन करण्यासाठी आणखी पर्यायी व्यवस्था करण्याची गरज निर्माण झाली आहे. चार हजार लोकांना प्रत्यक्ष भेटून माहिती घेतली जात आहे. सर्वेक्षणाची व्याप्ती वाढवली जात आहे. दुबार करावे लागले तरीही सर्व्हे केली जाणार. बफर झोनमध्ये असणार्‍यांच्या हातावर शिक्के मारले जातील आणि त्याना, पुढील तीन महिने बाहेर पडता येणार नाही अशा पद्धतीचे नियोजन करण्यात आले आहे.

मेडिकल विषम तारखेला सुरू राहतील. मात्र, त्यावेळेत मेडिकल सुरू न ठेवल्यास त्यांच्यावर कारवाई करुन त्यांचे परवाने रद्द करण्याचा इशारा देण्यात आला आहे. कोरोनाबधित लोकांच्या जवळपास 400 लोक संपर्कात आले आहेत. कोरोनाबाधित राहत असलेला शहरातील साडेतीन किलोमीटर अंतराचा परिसर सील करण्यात आला आहे. यात 11 हजार लोकसंख्या बंदिस्त केली आहे. 27 इन्स्टिट्यूट क्वारंटाईन केले आहेत. याशिवाय येत्या तीन दिवसात इस्लामपूर शहराच्या व शहरातील प्रभागांच्या सीमा बंदिस्त केल्या जाणार आहेत. इस्लामपूरमध्ये कोरोनाचे 24 रुग्ण आढळल्यानंतर तेथील नागरिक भीतीच्या छायेखाली आहेत. त्यामुळे या घाबरलेल्या नागरिकांसाठी इस्लामपूरच्या गांधी चौकात ज्या ठिकाणी कोरोना रूग्ण आढळले त्या ठिकाणी लोकांना प्रेरणा यावी म्हणून स्पिकर वरुन भजन वाजवले जात आहे. यामध्ये अनेक प्रसिद्ध भजने आणि देव देवतांची प्रेरणा गीते वाजवून नागरिकाच्यात असणारी भीती कमी केली जात आहे.