सांगली : कोविड रुग्णालयात कोरोनाबाधित वृद्धाची आत्महत्या

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव लक्षात घेता लोकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. अशातच सांगली येथील सरकारी कोविड रुग्णालयात एका कोरोनाबाधित वृद्धाने आत्महत्या केल्याची घटना नुकतीच समोर आली आहे.सोमवारी पहाटे हा प्रकार घडला. हुसेन बाबूमिया मोमिन असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांना कोरोना झाला होता व त्यांच्यावर सांगली येथील सरकारी कोविड रुग्णालयात उपचार चालू होते.

आज पहाटे त्यांनी स्वत:चा गळा कापून आपल्या जीवनाचा शेवट केला. या आत्महत्येबाबत मृताच्या नातेवाईकांकडून संशय व्यक्त करण्यात येत आहे. जोपर्यंत रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज मिळत नाही तोपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात येणार नाही अशी भूमिका नातेवाईकांकडून घेण्यात आली आहे. मिरजेतील सरकारी कोविड रुग्णालयातुन मिळालेल्या माहितीनुसार, हुसेन बाबूमिया मोमिन याना कोरोना झाल्यामुळे त्यांना १० दिवसांपूर्वी उपचारासाठी मिरज येथील सरकारी कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सोमवारी पहाटे आरोग्य कर्मचाऱ्यांना मोमिन यांच्या बेडवर रक्त आढळून आले. जवळ जाऊन बघितले असता त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. आरोग्य कर्मचाऱ्यांकडून या घटनेची माहिती मोमिन यांचा मुलगा मुस्तफा याला फोनद्वारे देण्यात आली तसेच पोलिसांना देखील कळवण्यात आले.

या घटनेची खबर मिळताच मिरज पोलिसांनी रूग्णालयात जाऊन पाहणी केली असता हुसेन मोमिन यांच्या गळ्यावर जखमा असल्याचे आढळून आले. तसेच त्यांच्या बाजूला चाकू देखील पडला होता. मोमीन यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान हुसेन मोमिन यांचा मुलगा मुस्तफा यांच्याकडून वडिलांच्या हत्येबद्दल संशय व्यक्त करण्यात येत आहे. आत्महत्या करण्यासारखी माझ्या वडिलांची मानसिक स्थिती नव्हती. रुग्णालयातील कोरोना वार्डमधील सीसीटीव्ही फुटेज देण्यात यावे, तसेच पोलिसांनी या घटनेची योग्य चौकशी करावी त्याशिवाय मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात येऊ नये अशी भूमिका मोमिन यांचा मुलगा मुस्तफा मोमिन यांच्याकडून घेण्यात आली आहे. कोरोनाबाधित रुग्णाने सरकारी कोविड रुग्णालयात आत्महत्या केल्याचे वृत्त समजताच संपूर्ण सांगली जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.