इस्लामपूरच्या कपील पवारची टोळी 3 जिल्ह्यातून हद्दपार

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – वाळवा तालुक्यातील इस्लामपूर शहरात दहशत माजवणार्‍या कपील पवारसह तिघांना सांगली, सातारा, कोल्हापूर या तीन जिल्ह्यांमधून हद्दपार करण्यात आले आहे. पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी इस्लामपूर पोलिसांच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. आतापर्यंत 35 हून अधिक टोळ्यांवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे.

कपील कृष्णा पवार (वय 23), सूरज ऊर्फ पांड्या अशोक जाधव (वय 21, दोघेही रा. इस्लामपूर), रोहित अरूण भोसले (वय 27, रा. इटकरे) अशी हद्दपार केलेल्यांची नावे आहेत. कपील पवार नवीन सदस्यांची संख्या वाढवत होता. शस्त्रांचा धाक दाखवून मारहाण करणे, जबरी चोरी, दरोडा, खंडणी, अपहरण, गर्दी मारामारी, खुनाचा प्रयत्न असे गुन्हे या टोळीकडून केले जात होते. या टोळीवर आतापर्यंत सहा गंभीर गुन्हे दाखल आहेत.

कपील पवारसह त्याचे साथीदार वारंवार गुन्हे करत असल्याने या टोळीवर हद्दपारीची कारवाई करण्याचा प्रस्ताव इस्लामपूर पोलिसांनी अधीक्षक शर्मा यांच्याकडे पाठवला होता. त्या प्रस्तावानुसार तिघांनाही सांगली, सातारा, कोल्हापूर या तीन जिल्ह्यातून एका वर्षासाठी हद्दपार करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक शर्मा यांनी दिले आहेत.

या कारवाईत स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक श्रीकांत पिंगळे, सहाय्यक निरीक्षक सुनील हारूगडे, सिद्धाप्पा रूपनर, शशिकांत जाधव यांनी भाग घेतला.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/