सांगली : नव्या एसपीचा दणका सुरू ! पहिल्याच दिवशी 2 नंबरवाल्यांवर कारवाई सुरू

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – जिल्ह्याचे नवे पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी सोमवारी कार्यभार घेतला. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार मंगळवारपासून अवैध धंद्यांना दणका देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. पहिल्याच दिवशी सुमारे 20 अवैध व्यावसायिकांना दणका देण्यात आला आहे.

गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्यात अनेक ठिकाणी छुप्या पद्धतीने मटका, जुगार, दारु, गांजा विक्री असे अवैध धंदे सुरुहोते. नूतन अधीक्षक गेडाम यांनी जिल्ह्यातील अवैध व्यवसायांवर कारवाई करण्यास सुरु केली आहे. मंगळवारी दिवसभर जिल्हाभर स्थानिक पोलिसांसह स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकांनीही अवैध धंद्यांवर कारवाई केली.

अधीक्षक गेडाम यांनी सर्व ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्­यांना कारवाई करण्याचे आदेश दिले होते. कारवाईत सातत्य ठेवून त्याचा अहवाल रोज अधीक्षक कार्यालयाला देण्यास सांगितले आहे. त्यानुसार मंगळवारी स्थानिक पोलिसांसह स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकांनी विविध ठिकाणी छापे टाकले.

दरम्यान, अवैध व्यवसायांबरोबरच खासगी सावकारांवरही कडक कारवाईचे संकेत अधीक्षक गेडाम यांनी दिले आहेत. शिवाय ज्या सावकारांवर दोन किंवा त्याहून अधिक गुन्हे दाखल आहेत. त्यांच्यावर हद्दपारीची कारवाई करण्याचेही आदेश दिले आहेत.