सांगली : पोलीसनामा ऑनलाईन – Sangli Crime News | बचत गटाचे निविदेनुसार देयक अदा करण्यासाठी चाळीस हजारांची लाच घेत असताना समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त नितीन उबाळे (Nitin Ubale) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) अटक केली आहे. कार्यालयातील कक्षातच लाच घेत असताना नितीन उबाळे लाचलुचपतच्या जाळ्यात सापडले आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराचे बचत गटाचे निविदेनुसार आठ लाख १२ हजार रुपये देयक मंजुरीसाठी १० टक्के लाच मागणी उबाळे यांनी केली होती. याबाबत तक्रारदारांनी लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली. या तक्रारीची नियमानुसार, पडताळणी करण्यात आली असता, लाच मागणी करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
देयकाच्या १० टक्केप्रमाणे ८० हजाराची लाच मागणी केली होती. मात्र, तडजोडीत ही ५ टक्केप्रमाणे ४० हजार रुपये ठरले. गुरुवारी समाज कल्याण विभागाच्या कार्यालयात लाचलुचपत विभागाच्या पथकाने सापळा लावला होता. सहाय्यक आयुक्त उबाळे कार्यालयाच्या प्रधान कक्षामध्येच ४० हजार रुपये लाच घेत असताना पथकाने छापा टाकून त्यांना रंगेहात अटक केली. भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार उबाळे यांच्या विरुध्द सांगली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती.