सांगली : पोलीसनामा ऑनलाईन – Sangli Crime News | इस्लामपूर येथील कुविख्यात गुंडाचा दोन हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने वार करुन खून केल्याची घटना घडली आहे. नितीन संजय पालकर (वय-३५) असे खून झालेल्या कुविख्यात गुंडाचे नाव आहे. ही घटना आज गुरुवार (दि.२४) वाळवा बझारसमोर भरदिवसा घडली. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. पालकर याच्यावर खून, खूनाचे प्रयत्न, खंडणी, हाणामारी असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याला मोक्काही लावण्यात आला. तो सध्या जामिनावर बाहेर होता.
अधिक माहितीनुसार, आज गुरुवार (दि.२४) दुपारी वाळवा बझार जवळ असलेल्या एका पानटपरीसमोर नितीन पालकर याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. बाजाराचा दिवस असल्याने याठिकाणी मोठी वर्दळ होती. भर रस्त्यात रहदारीच्या ठिकाणीच हा हल्ला झाल्याने खळबळ उडाली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पालकर याला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण, पोलीस निरीक्षक संजय हारुगडे यांनी घटनास्थळी भेट देत संशयितांच्या अटकेसाठी पोलिसांना सूचना केल्या. दोघा हल्लेखोरांनी हा खून केल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. हल्लेखोरांच्या अटकेसाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. पोलीस अधिक तपास करीत आहेत.