सांगलीतील स्वतंत्रपुर जवळ 11 लाखांची रोकड लंपास

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – जिल्ह्यातील आटपाडी येथून खासगी कंपनीची रोकड करगणी येथील बँकेत भरण्यास चाललेल्या व्यक्तीला मारहाण करून 11 लाख 62 हजारांची रोकड लंपास करण्यात आली. सोमवारी दुपारी पावणे एकच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत आटपाडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दोन अज्ञात व्यक्तींनी ही चोरी केल्याचा संशय आहे.

रेडियंट या खाजगी कंपनीमार्फत मोहन सुखदेव शिंदे (वय ३४ रा.मायाक्कानगर, आटपाडी) आटपाडी येथील ग्राहकांकडून रोख रक्कम गोळा करतात. ही रक्कम ते करगणीच्या आयसीआय बँकेत भरतात. कंपनीसाठी गेली पाच वर्षे ते हे काम करतात.

आज सकाळपासून शिंदे यांनी आटपाडी येथील रक्कम गोळा केली. एल आय सी मधून ५ लाख ७५ हजार ५३२ रुपये, डिलीव्हरी कंपनी चे ३ लाख ५१ हजार ५१६ रुपये, इंस्टाकार्ट कंपनीचे ९९ हजार ९१३ रुपये आणि एकॉम कंपनीचे १ लाख ३५ हजार ७० रुपये अशी ११ लाख ६२ हजार ३१ रुपयांची रक्कम त्यांनी गोळा केली.

ते ही सगळी रक्कम एका बॅगेत भरून स्वतंत्रपूरजवळ वाणी वस्ती जवळच्या घरी गेले. घरी आईची चौकशी करून ते थोड्या आडवाटेला वाणी वस्ती येथून मोटारसायकलवरुन (एम एच १० बी एल ९९२६) करगणी कडे निघाले. घरापासून थोड्या अंतरावर मोटारसायकल बंद पडल्याचा बहाना करून दोन युवक थांबले होते. शिंदे जवळ येताच या दोघांपैकी एकाने काठीने त्यांना मारले. अचानक हल्ला झाल्याने ते गाडीवरून पडले. त्यानंतर चोरट्यांनी पैशाची बॅग ताब्यात घेतली. शिंदे यांनी आरडाओरडा करून प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता त्यांना काठीने मारून बॅग घेऊन चोरटे करगणीच्या दिशेने पसार झाले.

Visit : Policenama.com